याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि.९) मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद महामार्गावरून विकास दाजीबा शेंडगे (रा.पांगरी खुर्द, जि.जालना) हे त्यांच्या ताब्यातील मालट्रकमध्ये (एम.एच१८ एए८६०७) ७४ लाख रुपये किमतीचे मद्याचे ९५० खोके घेऊन नांदेडच्या दिशेने जात होते. यावेळी शिवरे फाटा परिसरात सुमारे सहा ते सात लुटारुंनी चारचाकीतून येत ट्रक रोखला आणि शेंडगे यांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून ट्रकचा ताबा घेऊन पळ काढला होता. यानंतर शेंडगे यांनी निफाड पोलिसांकडे धाव घेत घडलेला सर्व प्रकार कथन केला. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करण्याचे आदेश अधीक्षक सचिन पाटील यांनी दिले. निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, उपनिरीक्षक अमोल पवार यांचे पथक तयार करून तपास सुरू केला. चोख गस्त, नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीवरून विंचुर एमआयडीसीजवळ पथकाने सापळा रचला. येथील बर्फाच्या कारखान्याजवळ चौघे संशयित एका ट्रकसह आले असता, पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि चौघांनाही बेड्या ठोकल्या. यामध्ये सचिन अर्जुन वाघचौरे, (३८,रा दत्त चौक, विजयनगर, सिडको), इरफान याकुब मोमीन (३३), शरिफ अब्दुल शेख (२३), अरबाज नजीर काजी (२४,रा. तीघे मनमाड) या संशयितांमध्ये समावेश आहे.पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यांच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या ताब्यातून हायजॅक करून पळविलेला ट्रक मद्याच्या मालासह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास निफाड पोलीस करीत आहेत.
मद्याचा ट्रक ‘हायजॅक’ करणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:41 AM