सिन्नर : दिंडोरी येथील युनायटेड स्पिरीट लिमिटेड कंपनीतून मॅकडॉवेल्स कंपनीच्या मद्याचे बॉक्स भरून चाकणकडे जात असलेला मालट्रक नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपासवर हॉटेल सुमंगल जवळ सफेद कारमधून आलेल्या सात अज्ञात चोरट्यांनी चालक व क्लिनरला मारहाण करीत चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. १४) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात ५९ लाख ४३ हजार ७१५ रुपये किमतीच्या मॅकडॉवेल्स कंपनीच्या मद्याचे ९४० बॉक्स व १० लाख रुपये किमतीचा भारत बेंन्झ कंपनीचा मालट्रक, तसेच चालकाच्या खिशातील तीन हजार रुपये रोकड व एक हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल असा एकूण ६९ लाख ४७ हजार ७१५ रुपयांचा ऐवज लांबविला.
लखन बुधा पवार (वय ३०) धंदा- चालक रा. साक्री, जि. धुळे. हल्ली रा. बिल्डिंग नं. २ म्हाडा कॉलनी चौथा मजला, सिमेन्स कंपनीच्या बाजूला गरवारे नाशिक व क्लिनर राजू पवार हे दोघे रामेश्वर आव्हाळे यांच्या मालकीची भारत बेंझ कंपनीची १२ टायर मालट्रक (एमएच.१८, ए.ए.-८८६७) ही शनिवारी (दि.१३) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दिंडोरी येथील युनायटेड स्पिरीट लिमिटेड कंपनीतून मॅकडॉवेल्स ब्रँडच्या मद्याचे ९५० बॉक्स भरून निघाले व रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकचा मालक रामेश्वर आव्हाळे यांच्या घरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ज्या ठिकाणी गाडी खाली करायची आहे त्या ठिकाणी रविवार असल्याने सुटी असते म्हणून त्या दिवशी रात्रभर गाडी मालक रामा आव्हाळे यांचे घरी पाण्याचे टाकीजवळ, जेलरोड नाशिक येथे उभी करण्यात आली होती. रविवारी (दि.१४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चालक लखन पवार व क्लिनर राजू पवार मालट्रक घेऊन चाकणला जाण्यासाठी निघाले. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपासवर हॉटेल सुमंगल जवळ पाठीमागून सफेद कारमधून आलेल्या सात अज्ञात चोरट्यांनी मालट्रकला गाडी आडवी लावून मालट्रक थांबविण्यास सांगितले. गाडी थांबविल्यानंतर त्यातील एकाने चालक पवार यास काही कागदपत्र दाखवून म्हणाला की, तुमच्या गाडीचे तीन हप्ते थकलेले आहे. आम्ही फायनान्स कंपनीचे माणसे आहोत. तुमची गाडी आता आम्ही फायनान्स कंपनीचे गोडावूनला घेऊन जाणार आहे. त्यानंतर चालक पवार याने मालक रामा आव्हाळे यांना फोन करून माहिती देत असताना दुसऱ्याने पवारच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत आव्हाळे यांना बोलला की, आमचे पैसे बाकी आहे आम्ही तुमची गाडी घेऊन गोडावूनला जातो. तुम्ही गुदामाला या. असे बोलून त्याने फोन कट केला व एकाने मालट्रकच्या ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला, तर बाकीच्यांनी चालक व क्लिनर यांना त्यांच्या सफेद रंगाच्या कारमध्ये बळजबरीने बसवून त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर कानटोप्या घालून त्यांना भोजापूर खोऱ्याच्या दिशेने घेऊन गेले. सोनेवाडी येथील माजी सरपंच कैलास सहाने यांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विकास काळे, हवालदार प्रकाश उंबरकर, प्रकाश गवळी, चव्हाणके यांनी तातडीने सोनेवाडी येथे जात चालक पवार यांना ताब्यात घेतले. लखन पवार याच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी सात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, सोमवारी (दि. १५) उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना तपासाकामी सूचना केल्या.
------------
अन् सुटका झाली
सुमारे अर्धा ते पाऊण तास गाडी चालवून त्यांनी गाडी एका सुनसान ठिकाणी थांबविली व त्यांना खाली उतरवत डोंगरावर चालत घेऊन गेले. डोंगरावर गेल्यावर त्यांनी दोघांचेही हातपाय दोरीने बांधून तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांच्या जवळील मोबाईल व पैसे काढून घेत त्यांना तेथेच सोडून निघून गेले. काही वेळानंतर चालक पवार यांनी स्वतःची सुटका करून डोंगरावरून दुसऱ्या बाजूने खाली उतरले व रस्त्याचे बाजूला असलेल्या एका घराजवळ जाऊन तेथील नागरिकांना आपबिती कथन केली. क्लिनर राजू पवार हा तेथेच डोंगरावर पडलेला आहे. त्याला सोडविण्यासाठी चला अशी विनंती केली. त्यानंतर तेथील नागरिकांनी बॅटऱ्या घेऊन डोंगरावर जात राजूची सुटका केली.