नाशिक : शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप करतानाच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांनी भाजप कार्यकर्त्यांसारखं वागू नये, आपल्याकडेही भाजपच्या १२० लोकांची यादी असून, ती आपण ईडीला पाठवणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. १२) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
केंद्र सरकारकडून राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करतानाच संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या प्रश्नांना उत्तर द्यायला समर्थ असल्याचे सांगत त्यांनी सरनाईक यांची पाठराखणही केली. त्याचप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकत्र लढताना यश आले असून नागपूर, पुणे येथील भाजपचा किल्ला ढासळला आहे, त्यामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले असून, त्याची सुरुवात नाशिकपासून होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली तरी याविषयी पक्षाच्या नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलनात फूट पाडू शकले नाही. सध्या देशातील वातावरण पेटले असून, सरकारने आता माघार घ्यावी, असा सल्ला देतानाच लोकसभेत कायदा पुन्हा चर्चेत आणून शेतकऱ्यांना अपेक्षित कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
इन्फो-१
मुंबईत शिवसेनेचीच सत्ता, मनसेला टोला
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आता मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबईत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष असून, कोणी कोणाबरोबरही गेले तरी सत्ता शिवसेनेचीच येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत हैदराबादमध्ये भाजपला ओवैसी मिळाले, मुंबईत काय ते बघू असे म्हणत त्यांनी मनसेलाही टोला लगावला.
इन्फो-२
पवार यूपीए अध्यक्ष झाले तर स्वागत
राष्ट्रीय पुरोगामी आघाडी (यूपीए)चे नेतृत्व कोणी करावे, ही केवळ चर्चा सुरू आहे. याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना यूपीएमध्ये नसली तरी महाराष्ट्राचा नेता यूपीएचा अध्यक्ष झाला तर त्याचे स्वागतच असल्याचे सांगत राऊत यांनी शरद पवार यांच्या संभाव्य यूपीए अध्यक्षपदावर निवडीचे स्वागत केले आहे. नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी खरे तर शरद पवारच पंतप्रधान झाले असते. मात्र, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यावेळी शरद पवारच पंतप्रधान व्हायला हवे होते, देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता आहे. परंतु, त्यांचे कर्तृत्व हाच त्यांना मोठा अडथळा ठरल्याची खंतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.