शहरातील खासगी क्लासेस १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आले. शाळाप्रमाणेच सुरक्षित अंतर ठेवत, मास्क वापर, हात स्वच्छ ठेवणे आदी निकष ठेवत सुरू करण्यात आल्या असल्या तरी देखील पालक वर्गात मात्र या बाबत उदासीनता दिसत आहे. खासगी क्लासेस सुरू करण्यात आले असले तरी यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे क्लासेसचे संचालक अमोल दवंगे यांनी सांगितले. यात शाळा, कॉलेज हे आताच सुरू झाले असल्याने क्लाससाठी वर्षभराचे शुल्क का भरायचे हा प्रश्न पालक वर्ग करीत आहे. परंतु काही पालक मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन क्लासशी संपर्क साधत आहेत. क्लास चालकांना मात्र शिकवणाऱ्या शिक्षकांची नियुक्तीवेळी केलेल्या कराराप्रमाणे वेतन द्यावेच लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नववी ते बारावीपर्यंतचे क्लास सुरू झाले. पालकांनी संमती देखील दिली परंतु काही पालक थोड्या दिवसासाठी का खर्च करायचा असा विचार करीत आहेत. परिणामतः खासगी क्लासेस सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरीही विद्यार्थी संख्या कमीच असल्याने खासगी क्लासेस आर्थिक अडचणीत येणार असल्याचेही दिसून येते.
पालकांच्या उदासीनतेने खासगी क्लास सुनेसुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:15 AM