आपल्या देशात लोकशाही असल्याने वेगवेगळ्या निवडणुका वेळोवेळी होतच असतात. गेल्या ५० ते ६० वर्षांत मी अनेक निवडणुका बघितल्या. नोकरी करीत असताना प्रत्यक्ष राजकारणात सहभागी होता आले नाही. वडील मात्र राजकारणात होते; मला राजकारण विषयाची आवड होती; परंतु पूर्वीचे राजकारण आणि आताचे राजकारण यात खूप फरक आहे. पूर्वीच्या काळात लोक नि:स्वार्थी होते. आता पैशाशिवाय कोणीही काम करीत नाही. सध्याच्या काळात प्रचार सभेला पैसे देऊन माणसे आणली जातात. मोठ्या राजकीय सभेला ६० टक्के लोक हे झोपडपट्टीमधून ५०० रुपये रोज देऊन आणले जातात. पूर्वी मात्र असे नव्हते. साधारणत: ४० वर्षांपूर्वीच्या काळातील एक निवडणूक आठवते. त्यावेळी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थीपणे प्रचार करताना दिसत. तेव्हा स्व. इंदिरा गांधी यांची धुळे येथे जाहीर सभा होती. आम्ही सर्व मित्र मिळून त्या सभेला गेलो होतो. तेथील प्रचार सभा आटोपून त्या मोटारीनेच नाशिककडे सभेसाठी रवाना झाल्या. तेव्हा दळणवळणाची साधने फारशी नव्हती. महामार्गदेखील रुंद नव्हते; परंतु इंदिराजी साधारणत: अडीच तासात नाशिकला पोहोचल्या. रस्त्यावरील अनेक गावांमधील लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून स्वागत करीत होते. आम्हीदेखील मिळेल त्या वाहनाने नाशिककडे निघालो. नाशिकलादेखील इंदिराजींची जाहीर सभा झाली. लोकांनी सभेला प्रचंड गर्दी केली होती. लोक घोषणा देत होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत होते. एकच दिवसात इंदिरा गांधींच्या दोन सभांमधील भाषणे ऐकण्याचा योग आला होता. तेव्हा टीव्ही वगैरेंसारखी साधने नव्हती. आता मात्र एकच भाषण १० वेळा ऐकता येते. आताचे पुढारी प्रचाराला येतात; पण आपल्या वाहनामधून खाली उतरतदेखील नाहीत. पूर्वी नेते आणि कार्यकर्ते दोन्ही जमिनीवर होते. आता दोघेही गाड्यांमध्ये असतात. जनतेचे प्रश्न मात्र कायम आहेत.रमेश नागरे
इंदिराजींच्या दोन सभा ऐकण्याचा योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 1:13 AM
आपल्या देशात लोकशाही असल्याने वेगवेगळ्या निवडणुका वेळोवेळी होतच असतात. गेल्या ५० ते ६० वर्षांत मी अनेक निवडणुका बघितल्या.
ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक