लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा’ अशा कितीही घोषणा दिल्या जात असल्या तरी पैसा, परिस्थिती आदि विविध कारणांमुळे प्रत्येकालाच शिक्षण घेणे शक्य होत नाही. अशा शिक्षणाच्या प्रवाहातुन बाजूला पडलेल्यांना पुन्हा एकदा ज्ञानामृत देऊन शिक्षित करणे, स्वत:चे स्थान निर्माण करण्यास मदत करणे हे काम शहरातील सामाजिक संस्था आणि वैयक्तिक स्तरावर अनेकजण करीत आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय साक्षरता दिनी’ त्यांच्या कार्याचा हा आढावा.दिशा संस्था : आनंदवलीजवळील विश्वास लॉन्स परिसरातील मोकळ्या मैदानावर २००५ पासून सुधा मेहता या गरीब मुलांना ‘दिशा’ अंतर्गत मोफत शिकविण्याचे काम करीत आहेत. पहिली ते दहावीच्या गरीब मुलांची शिकवणी घेतली जात आहे. सुधातार्इंना कल्पना ओहोळ, संगीता देशमुख, रेखा राजभर, स्नेहल कुलकर्णी, सुरेश दीक्षित, बिडवई या शिक्षकांचे बळकट हात लाभले आहेत. आपापली कामे सांभाळून हे शिक्षक मुलांना शिकवित आहेत. स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, जायंट ग्रुपसारख्या सामाजिक संस्था आर्थिक पाळबळ देण्याचे काम करीत आहेत. सेवा संस्था : सोशल एम्पॉवरमेंट फॉर व्हॉलेंटीअरी अॅक्शन अर्थात सेवा संस्था अनेक वर्षांपासून शहरातील शाळाबाह्य आणि शाळेत जाणाऱ्या, मात्र अभ्यासात कच्च्या असणाऱ्या, पेठरोडवरील अंबिकानगर आणि गंजमाळ जवळील भीमवाडी झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणाचे काम करीत आहे. या संस्थेचे कार्यकर्ते अॅड. राजपाल शिंदे, दीपक देवरे, राणी जाधव, वैशाली राऊत, विनय कटारे यासाठी कार्यरत आहेत. यावर्षी या झोपडपट्टीतील १३ मुलांना त्यांच्या राहिलेल्या विषयांची तयारी करून घेण्याबरोबर कॉलेजच्या अॅडमिशनचेही काम करवून घेण्यात आले आहे. युवान ग्रुप : वेगवेगळ्या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी युवान ग्रुपची अनौपचारिकरीत्या स्थापना केली. या ग्रुपमधील अपूर्व इंगळे, विराज देवांग, आदित्य भागवत, अभिषेक शिंपी, वेदांग जोशी, समाधान भारतीय यांसारख्या २० जणांनी दर शनिवारी, रविवारी सायंकाळी भीमवाडी झोपडपट्टी, अंबिकानगर, आम्रपाली झोपडपट्टी, आनंदवली येथे मुलांना शिकविण्यास जातात.
वंचित मुलांसाठी भरतात साक्षरता वर्ग
By admin | Published: July 08, 2017 1:15 AM