नाशिक : नाशिकच्या भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात २६ ते २८ मार्चदरम्यान होण्याची चिन्हे आहेत. या संमेलनाच्या तारखांची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.
नाशिकला होणारे हे तिसरे साहित्य संमेलन असून, यंदाचे संमेलन हे कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे या संमेलनासाठी सर्वाधिक महत्वाची बाब ही रसिक आणि साहित्यिकांची सुरक्षितता राहणार आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनाची तारीख मार्च महिन्यात अधिकाधिक अखेरच्या टप्प्यात ठेवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. त्यातही साहित्य रसिकांच्या दृष्टीने शुक्रवार ते रविवार हा कालावधी नेहमीच सोयीस्कर ठरत असल्याने यंदाच्या साहित्य संमेलनासाठीही शुक्रवार (दि. २६ मार्च) ते रविवार (दि. २८ मार्च) या कालावधीतच संमेलन रंगण्याची चिन्हे आहेत. दिनांक २६ मार्चला ध्वजारोहण, ग्रंथदिंडी आणि साहित्य संमेलनाचे उद्घाटन, २७ मार्चला विविध परिसंवाद, चर्चा, कवी संमेलन आणि २८ मार्चला साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. २८ मार्चला होळीसह रविवार आणि २९ मार्चला धुलिवंदनची सुट्टी असल्याने बाहेरगावच्या रसिकांसाठीदेखील या तारखा सोयीस्कर ठरणार असल्याने त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.
इन्फो
ग्रंथदिंडी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून
मराठी रसिकांचे दैवत असलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या टिळकवाडीतील निवासस्थानापासून २६ मार्चला ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच या ग्रंथदिंडीत ग्रंथांच्या पालखीसह नाशिकच्या परिघातील आदिवासी परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या बोहाडा नृत्यासह लोककलांचेदेखील दर्शन घडविण्यात येणार आहे.
इन्फो
साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण विभागीय केंद्रांवर
कोरोनामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाच्या उपस्थितीवर काहीसे निर्बंध राहणार असून, आसन व्यवस्थादेखील एक आसनाची जागा सोडून होणार आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचा लाईव्ह आनंद राज्यातील अधिकाधिक रसिकांना घेता यावा, यादृष्टीने राज्यातील सर्व विभागांच्या शहरांमधील मुख्य सांस्कृतिक केंद्रावर भव्य स्क्रीनवर प्रक्षेपण करण्याचा आयोजक लोकहितवादी मंडळाचा मानस आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा असणाऱ्या शहरांमध्येदेखील त्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.