नाशिक - सिंहस्थ पर्वणी जशी एक तपानंतर येते, तसा जवळपास दीड तपानंतर म्हणजे २००५ नंतर साहित्य पर्वणीचा अमृत योग नाशिककरांसाठी आलाय. ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ डिसेंबरला कुसुमाग्रज नगरीत म्हणजे भुजबळ नॉलेज सिटीत संपन्न होत आहे. नाशिककरांसाठी हा योग सिंहस्थ पर्वणी इतकाच अभिमानाचा आहे. या ज्ञानगंगेत आपल्या सहभागाचे अर्ध्य अर्पून, माय मराठीच्या ग्रंथसेवेला नमन करून, मराठी भाषेची ध्वजपताका अभिमानाने उंचाविण्यासाठी, तनमनाने तृप्तीची अनुभूती घेण्यासाठी सर्व साहित्य रसिक नाशिककर अत्यंत उत्सुक आहेत.
संमेलनाच्या पूर्व संध्येपासून म्हणजे २ ते ५ डिसेंबर या काळात बाल साहित्य, काव्य वाचन, गझल, कथाकथन, चर्चा परिसंवाद, विचारमंथन, ग्रंथ प्रकाशन, कला-ग्रंथ प्रदर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा दिवसभर चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांचे सुंदर नियोजन आयोजकांनी केले आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना ज्ञान, मनोरंजनाची जणू मेजवानी मिळणार आहे. ज्ञानेंद्रिय तृप्तीची सुखद अनुभूती अनुभवता येणार आहे. नाशिकचे स्थानिक कलाकार, कवी, सहित्यिक यांचाही यात लक्षणीय सहभाग आहे. सर्वांना सोबत घेऊन चालताना काही मतमतांतरे होतात. आपल्या घरातील मंगलकार्यातही जवळच्या मंडळींचे मानपानावरून काही रुसवेफुगवे होतात. कारण जवळच्यांचा तो हक्क आहे, असे आपण मानतो, तसेच इथेही समजून, सारं काही विसरून एकदिलाने संमेलनात सहभागी होऊन, माय मराठीची ध्वजा अभिमानाने उंचावू या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असल्याने साहजिकच त्याबाबत सर्व नियम पाळून दक्षता घेतली जात आहे. परिसर विस्तीर्ण असल्याने व कार्यक्रम दिवसभर असल्याने गर्दीची भीती बाळगण्याचे कारण नाही. येणारे सर्व रसिक प्रेक्षकही याबाबत वैयक्तिक दक्षता घेऊन संमेलनात सहभागी होऊन मनमुराद आनंद घेतील, हा विश्वास आहे. नेहमीच सामाजिक बांधिलकीतून सामाजिक हित जपणाऱ्या आमच्या दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सनेही यात सर्वार्थाने सक्रिय सहभाग घेतला आहे. सृजनशील, संवेदनशील आणि अभिरुचीसंपन्न साहित्यप्रेमींच्या सेवेची संधी या निमित्ताने आम्हाला मिळाली असून, ही जबाबदारी आम्ही आनंदाने मनःपूर्वक पार पाडत आहोत.
- दीपक चंदे, दीपक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स