लोकमत न्यूज नेटवर्क:
नाशिक : महाराष्ट्र निर्मितीच्या हिरक महोत्सवी वर्षात होणारे यंदाचे ९४ वे साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत यमुनेच्या तीरावर भरवायचे की महाराष्ट्रात गोदावरी तीरावर नाशिकला भरवायचे? हा मोठा पेच साहित्य महामंडळाला पडला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांतील संस्थांमधून आलेल्या प्रस्तावांबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी रविवारी साहित्य महामंडळाच्या औरंगाबादला झालेल्या बैठकीत स्थळ निवड समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र साळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांच्या नावांचा समावेश आहे. या बैठकीत पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. तसेच स्थळनिश्चितीसाठीच्या तारखा निर्धारित करण्यात आल्या. नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालय संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वादविवाद धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणीस आले असल्याने त्यांनी प्रस्तावित संमेलनासाठी पुढाकार घेण्याबाबत फारसा उत्साह दाखवला नाही. त्यामुळे नाशिकच्याच लोकहितवादी मंडळ या जुन्या संस्थेने नाशिकमध्ये साहित्य संमेलन भरवण्याचा प्रस्ताव महामंडळाला दिलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे हे साहित्य संमेलन मर्यादित स्वरूपात भरवायचे असल्याने ते दिल्लीला भरवल्याने आपसूकच मर्यादित होईल, असा काहींचा सूर असून नाशिकला भरवल्यास ते राज्य निर्मितीच्या हिरक महोत्सवी वर्षात मराठी मातीत भरल्याचा टिळा भाळी लागणार असल्याने महामंडळाची ही निवड समितीच अद्याप व्दिधा मनस्थितीत असल्याचे दिसते आहे.
इन्फो
स्थळ पाहणीनंतर होणार निर्णय
महामंडळाने नियुक्त केलेली स्थळ निवड समिती येत्या ७ जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊन स्थळ पाहणी करणार आहे. या निवड समितीला शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी कॅम्पस, व्ही. एन. नाईक संस्थेची जागा तसेच मुक्त विद्यापीठ परिसराची जागा दाखवली जाणार आहे. या जागा बघून मंडळाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ८ तारखेला स्थळ निश्चितीबाबत निर्णय घेणार असल्याने बहुधा त्याच दिवशी संमेलनाच्या शहरावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
--इन्फो---
स्थळ पाहणी केवळ देखावाच
गतवर्षीदेखील महामंडळाच्या निवड समितीने नाशिकमधील विविध स्थळांची पाहणी करून सर्व स्थळांबाबत समाधान व्यक्त केले होते. तसेच उस्मानाबादपेक्षा नाशिकमध्ये अधिक सोयीसुविधा असल्याचेही कबूल केले होते. तरीदेखील उस्मानाबादला एकही संमेलन झालेले नसल्याचे कारण देत उस्मानाबादचीच निवड केल्याने गतवर्षीच स्थळ पाहणी हा केवळ देखावाच असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला होता. समिती आधीच निर्णय घेते आणि स्थळ पाहणीचा केवळ देखावाच करते, अशी चर्चा साहित्य वर्तुळात गतवर्षापासूनच रंगलेली आहे.