नाशिक- येथे शुक्रवारपासून सुरू होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे जणू साहित्यिकांची दिवाळी होय त्यामुळे नाशिक महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व दिवंगत आणि विद्यमान साहित्यिकांच्या निवासस्थानावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांनादेखील यात सहभागी करून घेतले आहे.
येत्या तीन ते पाच डिसेंबर दरम्यान नाशिक जवळील भुजबळ नॉलेज सिटी म्हणजेच कुसुमाग्रज नगरीत 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तब्बल पंधरा वर्षांनी होणारे संमेलन, ही साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी घटना असून त्यामुळेच नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील स्मारके आणि साहित्यिकांची निवासस्थाने उजळून टाकण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तसेच ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अन्य अनेक दिवांगत साहित्यिकांची स्मारके तसेच निवासस्थाने यावर महापालिकेच्यावतीने विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
नागरिकांनीही आपल्या घरासमोर रांगोळ्या काढाव्यात तसेच आकाशदिवे लावून ही साहित्य दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहनही आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून त्यामुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयाजवळ ग्रंथदिंडीची सजावट करण्यात येत आहे.