नाशिक : दलित आत्मकथन हा त्या त्या लेखकाचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. पंडित पलुस्कर सभागृहात ‘वाबुकचा सम्यक संकल्प’ या आत्मकथन प्रकाशनप्रसंगी कांबळे बोलत होते. यावेळी प्रा. कांबळे पुढे म्हणाले की, वामनराव करवाडे यांचे आत्मकथन हे विकार आणि विखारमुक्त असल्याने ते इतर आत्मकथनांपेक्षा अनोखे आहे. ग्रामसंस्कृती ते नागरी जीवनाचा अर्धशतकाचा इतिहास या लेखनातून व्यक्त होतो. प्रा. गंगाधर अहिरे याप्रसंगी म्हणाले की, प्रस्तुत स्वकथन हे धम्मानुगामी वृत्तीचे आहे. संयत आणि संयमित निवेदनामुळे या आत्मकथनातील आंबेडकरी विचारसृष्टी सुगमतेने वाचकाच्या मनाला भिडते. प्रा. छाया लोखंडे यांनी ग्रंथातील विविध प्रसंग कथन करून लेखकाचा जीवनपट उलगडून सांगितला. करुणासागर पगारे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, करवाडे यांच्या आत्मकथनातून आपला कुटुंबकबिला नीतिवान विचाराने कसा जतन केला पाहिजे, याचे मार्गदर्शन मिळते. सरिता पाचपांडे यांनी प्रेरणा गीत सादर केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. धीरज झाल्टे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. धीरज झाल्टे यांंनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. रोहित गांगुर्डे यांनी करून दिला. डॉ. कांबळे यांना महाराष्ट्र राज्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा परिवर्त परिवारातील प्राचार्य रखमाजी सुपारे, कवी काशीनाथ वेलदोडे, अॅड. अशोक बनसोडे, कवी मधुकर जाधव, प्रदीप जाधव, नितीन भुजबळ आणि श्यामराव बागुल यांनी सत्कार केला. यावेळी पुष्पा करवाडे, गणेश साबळे, सुनील साबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले. माधुरी भोळे यांनी आभार मानले.
आत्मकथन अंतर्मुख करणारे साहित्य : ऋषिकेश कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:37 AM