घोटी : पाण्याच्या आणि भक्षाच्या शोधात असलेला सात महिन्याचा बिबट्या शुक्रवारी शिरेवाडी ता. इगतपुरी येथील विहिरीत पडला. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करून बिबट्याला अवघ्या दहा मिनिटांत विहिरीबाहेर काढले. यामुळे बिबट्याचे प्राण वाचले असून त्यावर टाकेद बुद्रुक येथील पशुवैदकीय दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत.इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागातील शिरेवाडी येथील शेतकरी शंकर राघु धोंगडे यांची बारा परस विहीर आहे. गुरु वारी रात्रीच्या सुमारास पाणी आणि भक्षाच्या शोधात असणारे सात महिन्याचा बिबट्या या विहिरीत पडला. आज सकाळी ते पाणी पाहण्यासाठी आले असता त्यांना विहिरीत बिबट्या दिसला. तातडीने त्यांनी वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ या घटनेबाबत ह्या भागाचे वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना माहिती दिली. वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्याकडून मार्गदर्शन मिळताच वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून त्याचा प्राण वाचवला. अवघ्या दहा मिनिटांत बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. यानंतर स्वत:च्या वाहनात टाकून अत्यावश्यक उपचार करण्यासाठी टाकेद बुद्रुक येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू केले. वन खात्याने सुरक्षिततेसाठी दिलेल्या विशेष किट मध्ये कर्मचारी सज्ज झालेले होते.
इगतपुरी तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:40 PM