नामपूर : चिराई (ता. बागलाण) येथील गावच्या शेतशिवारात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्या मादी आपल्या दहा दिवसांच्या चार बछड्यांसह रात्री निघाली असता, यातील दोन बछडे विहिरीचा अंदाज न आल्याने शेतातील विहिरीत पडले. रेस्क्यू टीमने शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सुरु केलेल्या रेस्क्यू आॅपरेशन १.३० बजता संपले. विहिरीत उतरलेले वनमजूर कैलास पवार यांच्या मदतीने दोर व क्यारेटच्या सहाय्याने बिबट्या मादीच्या बछड्यांना सुरक्षित बाहेर काढण्यास वनविभागाला तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चिराई गावच्या शेतशिवारात भास्कर वेडू अहिरे यांची विहीर असून, सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता. यावेळी भास्कर अहिरे यांना बिबट्या मादीचे डरकाळी फोडण्याचा आवाज आला. अहिरे यांनी पाहण्यासाठी विहीरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीतील किनाऱ्याचा आसरा घेतानाचे दोन दहा दिवसांचे बिबट्या मादीचे बछडे बसल्याचे दिसले. घटनेचे गांभीर्य ओळखून अहिरे यांनी तातडीने वनविभाग यांच्याशी संपर्क साधून बिबट्या बछड्यांची माहिती दिली. थोड्याच वेळात वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए. कांबळे, वनपाल पी. आर. बोरसे यांच्यासह संजय अहिरे, साहेबराव वेडू, नामदेव अहिरे, दिनकर अर्जुन, महेंद्र युवराज आदी ग्रामस्थ हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी रेस्कू आॅपरेशन करण्यास सुरु वात केली. दरम्यान, चिराई परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच त्यांनी रेस्क्यू आॅपरेशन करण्यास प्रारंभ केला. त्यांनी वनमजूर कैलास पवार यांना विहिरीत उतरवले. पवार यांनी तातडीने दोरीने कॅरेट बांधून विहिरीत सोडले. त्यानंतर अथक प्रयत्नांनी त्या दहा दिवसांचे असलेल्या बछड्यांना कॅरेटच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
बागलाण तालुक्यात बिबट्याच्या बछड्यांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:04 PM