नाशिक : ‘रोडकिल’च्या घटना थांबता थांबत नसून महामार्गांवर वन्यजीवांचा अपघाती मृत्यूच्या घटना घडत असताना बेदरकारपणे भरधाव वाहने चालविण्याच्या प्रमाण गावपातळीवरील अंतर्गत रस्त्यांवरही वाढत असल्यामुळे सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी रस्त्यावर एका भरधाव वाहनाने सोमवारी पहाटेच्या सुमारास आपल्या आईसोबत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या दोघा बछड्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना सकाळी उघडकीस आली.रस्त्यांवरून वाहने चालविताना रस्ता सुरक्षा महत्त्वाची असून याबाबत सातत्याने प्रादेशिक परिवहन विभागापासून सर्वच पोलीस दल, वनविभागाकडून जनजागृती केली जात आहे; मात्र भरधाव वेगाने बेदरकारपणे वाहने चालविण्याचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे रस्त्यांवर अपघातात माणसांसह वन्यप्राण्यांनाही आपले प्राण गमवावे लागत आहे. सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी गावाकडे जाणा-या रस्त्यावर अपघातात साधारणत: सहा महिन्यांच्या बिबट्याच्या दोन बछड्यांचा अंत झाला. या अपघातात सुदैवाने बिबट मादी आणि तिचा एक बछडा बालंबाल बचावल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. अपघातानंतर मादी आणि पिल्लू याच परिसरात भीतीने दडून बसल्याचे गावकऱ्यांनी वनविभागाला सांगितले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या भागात वनविभागाच्या सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी वनरक्षक, वनपाल यांना गस्तीच्या सूचना दिल्या आहेत. शेतापासून शेतकºयांनी लांब अंतरावर थांबावे, असे आवाहन केले आहे. बिबट मादी आक्रमक होऊन चवताळून अचानकपणे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.
अज्ञात वाहनाचा तपास सुरू पहाटेच्या सुमारास भाजीपाला वाहतूक करणा-या एका अज्ञात वाहनाने बछड्यांचा चिरडल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. त्यादिशेने वनपरिक्षेत्रीय अधिकारी सोनवणे यांनी तपासाला गती दिली आहे. मृत बछड्यांचे पशुवैद्यकिय अधिका-यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वनउद्यानात त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.