नाशिक : इगतपुरी-त्र्यंबक येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार उदय गो़ कुलकर्णी (१०, अमेया अपार्टमेंट, गायकवाड मळा, नाशिकरोड) यांची कर्जाच्या अमिषाने ऑनलाईन पद्धतीने ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांनी तक्रार केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णी यांनी एका दैनिकात आलेली कर्जाविषयी जाहिरात वाचली. या जाहिरातीनुसार कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी मोबाईल क्रमांक (८८२८६०६९१८) वर संपर्क केला. या मोबाईलवरील वैशाली मोरे या महिलेने कागदपत्रे व बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत ‘वनकॅपिटल@आऊटलूक डॉट कॉम’ या वेबसाईटवर पाठविण्यास सांगून कर्जासाठी प्रथम दोन हजार ७५० रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या कल्याण (प़)शाखेत राजेंद्र गायकवाड या व्यक्तीच्या नावावर भरण्यास व पावती मेल करण्यास सांगितले. त्यानुसार पैसे भरल्यानंतर याच कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावरून आनंद कुमार व एका महिलेने कर्ज मंजूर झाल्याचे सांगून तसा ईमेल कुलकर्णी यांना पाठविला. या मेलवर स्वाक्षरी करून तो मेल पुन्हा पहिल्या ईमेल अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले़ तसेच कर्जाच्या दोन हप्त्याची रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या त्याच खात्यात २१ हजार २०० व आठ हजार दोनशे असे भरण्यास सांगितले. त्यानुसार १४ व १५ मे रोजी कुलकर्णी यांनी ही रक्कम संबंधित गायकवाड नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा केली. विशेष म्हणजे ही रक्कम भरत नाही तोपर्यंत कुलकर्णी यांना मोबाईलवर फोन सुरू होते.कुलकर्णी यांनी बँकेत पैसे भरल्यानंतर कर्जाच्या रकमेसाठी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंका आल्याने त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन ३२ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली.
कर्जाच्या अमिषाने नायब तहसिलदाराची आर्थिक फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 7:02 AM