नाशिक : महापालिकेला विविध कारणांसाठी काढाव्या लागणाऱ्या कर्जाची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या दहा ते पंधरा दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली. पालिकेची आर्थिक स्थिती अगदीच वाईट नाही. तथापि, आर्थिक नियोजन करावे लागणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.एलबीटी वसुली जकातीच्या तुलनेत अल्प असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला होता. गेल्या महिन्यात तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच मंजूर कामांचे दायित्व आणि कुंभमेळ्याच्या कामांचे आव्हान असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेला कर्ज काढण्याची परवानगी राज्य शासनाने वर्षभरापूर्वीच दिली आहे, परंतु अद्याप कर्ज काढण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले की, पालिकेने कर्ज काढण्यासाठी मागविलेल्या प्रस्तावांची छाननी अंतिम टप्प्यात आली असून, येत्या दहा ते पंधरा दिवसांत कर्ज उभारण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. सध्या पालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीविषयी चर्चा सुरू असल्या, तरी पालिकेची स्थिती इतकीही वाईट नाही, असे त्यांनी सांगितले. एलबीटीच्या माध्यमातून जकातीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाले. तथापि, ही स्थिती अशीच राहणार नाही. एलबीटी नवीन कर आहे, असे ते म्हणाले. पालिकेने आर्थिक नियोजनाची तयारी केली असून, कामांचा प्राधान्यक्रम ठरविला जाईल. तसेच अत्यावश्यक कामे हाती घेतली जातील, असेही आयुक्त म्हणाले. (प्रतिनिधी)
पंधरा दिवसांत कर्ज उभारणी
By admin | Published: July 02, 2014 12:58 AM