नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन जागा भरण्याचे राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहे. मात्र, प्राधिकरणाचे नियम वेशीला टांगून या दोन जागा भरण्याचा घाट संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. ठरावीक माजी संचालकांसाठी संचालक मंडळाकडून अट्टाहास केला जात असल्याची चर्चा आहे.जिल्हा बँकेचे माजी संचालक अपूर्व हिरे (ओबीसी गट) व अद्वय हिरे (मालेगाव तालुका गट) यांनी गेल्यावर्षी राजीनामा दिला. तत्कालीन संचालक मंडळाने हे दोन्ही राजीनामे मंजूर केले होते. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाने बँकेला पत्र पाठविले असून, त्यात या रिक्त जागा, ज्या प्रवर्गातील आहेत त्याच प्रवर्गातील पात्र सदस्यांमधून स्वीकृतीने संस्थेच्या समितीकडून संचालक मंडळाच्या सभेमध्ये निर्णय घेऊन भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने कार्यपद्धती ही नमूद केलेली आहे. त्यात प्रामुख्याने इच्छुक पात्र सभासदांकडून अर्ज मागविणे, सदर व्यक्ती सहकारातील तज्ज्ञ असावी, तिचा बँकेला लाभ होईल, असे नियम देण्यात आलेले आहे. परंतु, हे नियम पायदळी तुडवून संचालक मंडळांकडून ठरावीक व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काही संचालकांनी ठरावीक व्यक्तींच्या नावाचा अट्टाहास केला असून, त्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची जोरदार चर्चा जिल्हा बँकेच्या वर्तुळात आहे. ठरावीक नावांसाठी संचालकांमध्ये लॉबिंगही सुरू झाले आहे. त्याकरिता अनेक संचालकांनी दबाबतंत्र सुरू केल्याचे कळते. आगामी निवडणुका लक्षात घेऊन संचालकांनी नावे पुढे केल्याचे समजते. मात्र, यातील अनेक नावे ही नियमबाह्य आहेत. परंतु, ही नावे निश्चित करण्याचा संचालकांकडून घाट घातला जात असल्याचे समजते. दरम्यान, या जागा भरण्याकरिता संचालक मंडळाची विशेष बैठक बोलाविणे गरजेचे आहे. ही बैठक घेण्याचीही तयारी सुरू झाली आहे याच बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.सर्वपक्षीयांची तयारीदोन संचालक पदासाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, मविप्रचे चिटणीस अॅड. सुनील ढिकले, माजी संचालक राजेंद्र डोखळे, नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक सोहनलाल भंडारी, माजी आमदार अनिल अहेर, शिवसेनेचे कुणाल दराडे, पंढरीनाथ थोरे यांच्या नावाची चर्चा आहे.
जिल्हा बॅँकेच्या दोन संचालक नियुक्तीसाठी लॉबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:58 AM