नाशिक : आगामी नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.कॉँग्रेसने राष्ट्रवादीमुळे नुकसान झाल्याचा जो डांगोरा पिटला आहे त्यांनी हे विसरता कामा नये की, आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षे कॉँग्रेसचा मुख्यमंत्री हा केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पाठिंबा असल्यानेच झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे कॉँग्रेसचे नुकसान नव्हे तर फायदाच झाला आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सरकार स्थापन केले. मात्र या सरकारला जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कळालेले नाहीत. शेतकरीविरोधी सरकार आहे. कांद्याला किलोमागे एक रुपया अनुदान जाहीर करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती समजलेली नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी २० वर्षे आधीच कांद्याला १०० रुपये अनुदान जाहीर केले होते, अशी टीकाही त्यांनी केली. कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनमुक्ती कायदा असो की सहकार दुरुस्ती कायदा असो, केवळ विरोधी पक्षांविरोधात पूर्वग्रह दूषित ठेवून सरकारने निर्णय घेतले. ते निर्णय आज त्यांना मागे घेण्याची व दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष कोणतीही आघाडी न करता घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढविणार आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे अधिकार देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, चिटणीस अर्जुन टिळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव, विष्णुपंत म्हैसधुणे, छबू नागरे, प्रेरणा बलकवडे, प्रमोेद हिंदुराव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका स्वबळावर
By admin | Published: August 29, 2016 1:52 AM