मुंजवाड : बागलाण तालुक्यातील खमताणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका वारंवार रजा टाकून शाळेत गैरहजर राहत असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून गुरुवारी संतप्त पालकांनी सकाळी दुसरीच्या वर्गाला टाळे ठोकत हे आंदोलन केले. याची दखल घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी एम. व्ही. सूर्यवंशी यांनी शाळेला भेट देऊन पालकांची समजूत काढली. यामुळे दुपारी १ वाजता शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली.यावेळी संबंधित शिक्षिकेच्या बदलीसाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. खमताणेतील जि.प. शाळेतील दुसरीच्या शिक्षिका इंदूबाई निंबा सोनवणे २०१४-१५ व २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नेहमीच अल्प व दीर्घ रजेवर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार पालकांनी केली. याबाबत विचारणा करण्यासाठी पालक शाळेत गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मला वाटेल तेव्हा मी शाळेत येईल, मला वाटेल तेव्हा मी रजेवर जाईल असे ते सांगतात. १५ आॅगस्ट रोजी झालेल्या पालक सभेत शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचे ठरले होते. त्यामुळे पालकांनी मुलांचा शाळेत प्रवेश घेतला. दोन महिन्यातच सेमीचे वर्ग बंद पडले. याबाबत जाब विचारल्यास तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? असे उत्तर मिळते. नेहमीच गैरहजर राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या या शिक्षिकेची बदली करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. इतर तीन वर्गांचे शैक्षणिक वर्ग सुरळीत सुरू असून दुसरीच्याच वर्गाचे नुकसान होत असल्याने पालकांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात माजी सरपंच प्रदीप इंगळे, उपसरपंच नितीन वाघ, नरेंद्र इंगळे, जयवंत बागुल, रमेश सोनवणे, वैशाली अहिरे, शंकर इंगळे, यशवंत बागुल, लक्ष्मण सूर्यवंशी, केशव सूर्यवंशी, नामदेव गुंजाळ, संतोष जाधव, जयपाल वाघ, राकेश वाघ आदि पालक उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यवंशी व केंद्रप्रमुख डी. आर. बोरसे यांनी शाळेला भेट देऊन पालकांची समजूत काढली. त्यानंतर दुपारी १ वाजता वर्ग पूर्ववत सुरू करण्यात आले. (वार्ताहर)
खमताणेत संतप्त पालकांकडून वर्गाला कुलूप
By admin | Published: December 10, 2015 10:55 PM