पाटोदा (गोरख घुसळे) : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बाजार समित्या तसेच आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतमाल शेतातच लॉकडाऊन झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतमाल विक्री केला नाही तर खरिपाला भांडवल कसे उपलब्ध करावे, या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. कृषी सेवा केंद्रांनाही सकाळी अकरा वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे, या बंधनामुळे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होत आहे.
मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे शेतकरी वर्ग अगोदरच मेटाकुटीस आलेला असताना रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग निमुटपणे मिळेल त्या भावात खते, बी-बियाणे खरेदी करीत आहे.
खरीप हंगामाच्या लागवडीकरिता भांडवल उभे करण्याचा हा काळ आहे. मात्र खरिपाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना शेतमाल विक्री, बी-बियाणे, रासायनिक खते, पीककर्ज उपलब्ध करणे ही महत्त्वाची कामे पार पाडावी लागतात. मृग नक्षत्रापूर्वी शेतकरी वर्ग या सर्व बाबींची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असतो. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बँकांना सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. खते, बियाणे खरेदी-विक्रीच्या दुकानांवर बंधने घालण्यात आली असून त्यांना केवळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच ही कृषी सेवा केंद्र उघडी ठेवण्यासाठी सवलत देण्यात आल्याने शेतकरी दुकानापर्यंत येता येता वेळ संपत असल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन बिघडले आहे.
खरीप हंगामाचे नियोजन हे खरीप हंगामात होणाऱ्या शेतमालाच्या तसेच भाजीपाल्याच्या विक्रीवर होत असते. या शेतमालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या मोबदल्यावर खरीप हंगामाची दिशा ठरत असते. मात्र बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल विक्रीवर परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसात बाजार समित्या सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर शेतमाल विक्रीला येणार असल्याने बाजारभावात कमालीची घट येणार असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. तर आठवडे बाजार बंद असल्याने व गावगावांतही शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस मज्जाव केला जात असल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी भाजीपाला जनावरांना खाऊ घालून ते आर्थिक नुकसान सहन करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
.................................................................
‘रासायनिक खतांच्या किमती मागे घ्या’
खरीपाच्या तोंडावर खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत ६० टक्के दरवाढ केली आहे. मागील वर्षापासून कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने शेतीची कामे सुरु केलेली असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी भरमसाट किमती वाढविल्या आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची परवड झाली आहे.
- भागीनाथ शेळके, शेतकरी ठाणगाव
..............................................................
शेतमालाला हमीभाव मिळावा
बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल शेतात पडून आहे, तर भाजीपाला सडून चालला आहे. शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. आधीच अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी बरबाद झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खतांच्या किमतीत भाववाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
- गोरख निर्मळ, शेतकरी, पाटोदा
.........................................................
‘बाजार समिती व्यवहार सुरू करा’
कोरोना प्रभावामुळे बाजार समिती व्यवहार बंद असल्यामुळे शेतमाल व भाजीपाला विक्री बंद झाली आहे. खरीप हंगामासाठी भांडवल उभे करण्यासाठी शेतमाल बेभावात विकावा लागत आहे. कोरोना नियमांचे पालन करीत बाजार समिती व्यवहार सुरू करून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सवलत द्यावी. जेणेकरून शेतमाल विकून खरीप हंगामासाठी भांडवल उभे करता येईल.
- ज्ञानेश्वर बोरनारे, शेतकरी, पाटोदा
……………………………………………………………..
‘कृषी सेवा केंद्र सुरू ठेवावे’
लॉकडाऊन कृषी सेवा केंद्र सकाळी अकरा वाजेपर्यंतच सुरू असल्यामुळे बाहेरगावच्या शेतकऱ्यांना वेळेत पोहचता येत नाही. तसेच कमी वेळेमुळे दुकानामध्ये शेतकरी वर्गाची गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने कृषी दुकानांना सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सवलत द्यावी.
- सतीश वाघ, कृषी सेवा संचालक, पाटोदा