नाशिक: मागील वर्षी प्रमाणेच यंदाही शिवभोजन थाळीचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील गेारगरीब, सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. कोरोनाच्या संकट काळात निर्माण अनेकांच्या कामकाजावर परिणाम झाल्याने, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी मोफत शिवभोजन थाळ्यांमध्ये अधिक वाढ करण्यात आली असून, येत्या १४ जूनपर्यंत नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत मिळून, सध्या १६ हजार ९२५ शिवभोजन थाळ्या वितरित होत आहेत. यामध्ये यंदा वाढ केली जाणार असून, त्या दृष्टीने मंजुरीची तयारी केली जात आहे. पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी तीन हजार शिवभोजन थाळ्या वाढीव वितरित केल्या जाणार असल्याचे समजते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे या थाळीचा दर पाच रुपये करण्यात आला होता. मागील १५ एप्रिलपासून शिवभोजन थाळी मोफत वितरित केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात ४५ शिवभोजन केंद्रे असून, सात हजार शिवभोजन थाळ्या वितरित होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात २८ शिवभोजन केंद्रे असून, ३ हजार ५०० शिवभोजन थाळ्या वितरित होतात. जळगाव जिल्ह्यात ३८ शिवभोजन केंद्रांवर ३ हजार ४२५, धुळे जिल्ह्यात १५ केंद्रांवरून दीड हजार तर नंदुरबार जिल्ह्यात १२ शिवभोजन केंद्रांवर दीड हजार शिवभोजन थाळ्यांचे वितरण केले जात आहे. जिल्ह्याभरातील नागरिकांची वर्दळ असलेल्या बाजार समिती, तहसील कार्यालय, मुख्य बाजारपेठ , बस स्थानके अशा ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आल्याने, त्याचा लाभ आलेल्या नागरिकांना होत आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या ४५ शिवभोजन थाळी केंद्रे असून, दिवसाला सात हजार थाळ्या वितरित केल्या जातात. त्यात अधिक अडीच पट थाळ्या दिल्या जात असून, ही संख्या नऊ हजारांच्या पुढे जात आहे.