राजापूर : येथे टँकरच्या चार खेपा मंजूर असताना दोनच खेपा मिळत असल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत आपला संताप व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. १९ एप्रिल रोजी टँकर सुरू होण्याकरिता रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्या अगोदर टँकर सुरू झाल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामविस्तार अधिकारी आर.एस. मंडलिक ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. सदर घटनेची माहिती गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांना देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत कुलूप उघडण्यात आले नव्हते. या आंदोलनात मीराबाई वाघ, कीर्ती सोनवणे, कल्याबाई सोनवणे, गीता सोनवणे, अलका इप्पर, उमा इप्पर, पुंजाबाई सानप, विठाबाई घुगे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. राजापूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटचांई निर्माण झाल्याने महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यातच टॅँकरच्या खेपा कमी येत असल्याने महिलांची धावपळ उडत असल्याचे चित्र आहे.
राजापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:16 AM