मालेगाव : आढावा बैठकीत विनापरवानगी बोलल्यामुळे तालुक्यातील सायतरपाडा येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक पृथ्वीराज शिरसाठ यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. विद्यार्थ्यांसह शाळेच्या प्रवेश-द्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी मंगळवारपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या आठवड्यात अग्रसेन भवन येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, शिक्षण सभापती यतीन पगार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत पृथ्वीराज शिरसाठ यांनी शिक्षकांविरोधातील विधानाला आक्षेप नोंदविला होता. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी शिरसाठ यांना विनापरवानगी बोलल्या बद्दल निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर सायतरपाडा येथील संतप्त पालकांनी शाळेला आज, शुक्रवारी कुलूप ठोकले होते. तसेच विद्यार्थ्यांसमवेत शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. शिरसाठ यांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी डी.एस. गायकवाड, केंद्रप्रमुख शारदा पवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आंदोलक भूमिकेवर ठाम होते. पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, पं. स. सदस्य अरुण पाटील, भाजयुमोचे लकी गील यांनीही मध्यस्थी केली. आंदोलनस्थळी गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी भेट देऊन पालकांशी चर्चा केली. मंगळवारपर्यंत याबाबत पाठपुरावा करून निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सरपंच अरुण शेवाळे, उपसरपंच हिरामण दळवी, ग्रा.पं. द्रोपदाबाई गायकवाड, मनीषा शेवाळे, मधुकर थोरात, जिभाऊ त्रिभुवन, रमेश वाघ, लक्ष्मीबाई त्रिभुवन, छोटू साळुंके, बबन सोनवणे, भुराबाई दळवी, एकलव्य वीरता संघटनेचे राज्यप्रमुख दशरथ त्रिभुवन आदिंसह पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते.
सायतरपाडे शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:59 AM