नाशिक : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कामगार-व्यवस्थापन संघर्षामुळे अडचणीत आलेल्या पॉवरडील एनर्जी सिस्टीम कंपनीत अखेर टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून, त्यामुळे कारखान्यातील कामगार रस्त्यावर आले आहेत. अर्थात, कामगारांच्या संपामुळेच कंपनी अडचणीत आल्याचा दावा व्यवस्थापकीय संचालक महेश खैरनार यांनी केला आहे. विल्होळी येथे असलेल्या या कारखान्यात अखिल भारतीय मजदूर सभेच्या चॉँदबीबी झैदी यांची कामगार संघटना आहे. या कंपनीत गेल्या काही वर्षांपासून कामगार आणि व्यवस्थापन संघर्ष सुरू असून, गेल्या काही दिवसांपासून कंपनीतील कामगारांनी संप पुकारल्याने काम बंद आंदोलन करण्यात येत होते, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीत कामगारांच्या संपामुळे उत्पादित माल पोहोचवण्यात अडचणी आल्या असून, पुढील आॅर्डर मिळणे बंद झाले आहे, असे खैरनार यांचे म्हणणे आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. कंपनीत चारशे कामगार काम करतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कामगारांना दोन ते तीन महिन्यांनी वेतन देणे, बोनसच न देणे असे प्रकार होत असल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. कामगारांना वैद्यकीय विमा नाहीच; परंतु शासनाने निर्धारित केल्यानुसार किमान वेतनही दिले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे सभेच्या अध्यक्ष झैदी यांनी कारखान्यावर अलीकडेच सभा घेऊन कारखान्यातून एक स्क्रूही बाहेर जाऊ दिला जाणार नाही, असा इशारा दिला होता. अर्थात, कारखान्यात संप करा असा कधीही सल्ला झैदी यांनी दिलेला नाही आणि त्यामुळे कामगार केवळ आपल्या हक्कासाठी लढत आहेत.
विल्होळीच्या ‘पॉवरडील’मध्ये टाळेबंदी उत्पादन बंद : कामगार-व्यवस्थापन संघर्षाची परिणती
By admin | Published: June 14, 2015 1:52 AM