इंदिरानगर : येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला सुमारे तीन वर्ष होऊनसुद्धा अद्यापपर्यंत मान्यता न मिळाल्याने लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. अद्यापपर्यंत लॉकअपचा प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.इंदिरानगर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे, संघटना आणि नागरिकांनी आंदोलने करून निवेदने दिली. यानंतर जनतेच्या भावनांची कदर करीत स्वतंत्र पोलीस ठाण्यास मंजुरी देण्यात आली. दि.१ एप्रिल २०१० रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. इंदिरानगरला स्वमालकीची इमारत बांधून तयार नसल्याने तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या एका इमारतीत पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. या पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध विभागास स्वतंत्र व्यवस्था आणि लॉकअपअभावी मोठी गैरसोय होती. त्यामुळे स्वमालकीची जागा शोधत असताना सुमारे ४३ वर्षांपूर्वी पोलीस विभागाच्या मालकीच्या असलेल्या जागेचा शोध २०११ मध्ये लागला. त्यामुळे स्वमालकीच्या जागेत नूतन इमारतीचा प्रश्न मार्गी लागला होता. तसेच नूतन इमारतीत अधिकारी आणि कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि संशयित गुन्हेगारांना भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदी पोलीस ठाण्यात ने-आण करण्याची अडचण दूर होणार होती. पोलीस ठाण्याचे भूमिपूजन करून दीड वर्षांत इमारत पूर्ण करण्यात आली.इ.स. २०१६ मध्ये पोलीस ठाण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तीन वर्षे होऊनसुद्धा अद्यापपर्यंत लॉकअपला मान्यता न मिळाल्याने संशयित गुन्हेगाराला अटक केल्यानंतर चौकशीसाठी ठेवण्यास अडचण निर्माण होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे घडत असतात आणि गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे संशयित गुन्हेगाराला पकडल्यानंतर चौकशीसाठी त्याला अटक करावी लागते. तेव्हा त्याला भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदी ठिकाणी लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी ने-आण करावी लागते. एखादा सराईत गुन्हेगार लॉकअपमध्ये नेताना पळून गेल्यावरच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या लॉकला मान्यता मिळणार आहे का? तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला संबंधित विभागाकडून मान्यता मिळणे गरजेचे आहे.लॉकअप शोभिवंत वस्तूतीन वर्षांपासून पोलीस ठाण्याचे लॉकअप धूळखात पडून आहे. जर मान्यताच द्यायची नव्हती तर लॉकअप बांधून पैसा कशाला खर्च केला? पोलीस ठाण्याचे लॉकअप किती दिवस शोभिवंत वस्तू म्हणून राहणार ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पोलीस ठाण्यातील लॉकअप धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:10 AM