उमराणे : चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याचे काम पूर्ण होऊन पूरपाणी मिळावे यासाठी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता आक्रमक झाली आहे. जोपर्यंत लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तिसगाव येथील शाळांना कुलूपच राहणार असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय भांडवल म्हणून वापरण्यात येणारा चणकापूर-झाडी एरंडगाव कालवा पूर्णत्वासाठी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतु या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने हा कालवा गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून अपूर्णावस्थेत पडून आहे. तालुक्याच्या पूर्व भागात चालू वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. पाण्याअभावी खरीप पिके जळून खाक झाली आहेत. काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिसगाव येथील ग्रामसभेत आगामी होणााऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकून प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना गावबंदीचा ठराव करण्यात आला. त्यानंतर लगेचच दुसºया दिवशी ग्रामस्थांनी आक्र मक भूमिका घेत गावातील शाळांना कुलूप लावण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत कालवा पूर्णत्वाचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत शाळांना कुलूपच राहणार असल्याचे संघर्ष समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयास तसे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर देवानंद वाघ, महेंद्र पाटील, बाळासाहेब अहेर, तुषार अहेर, राजेंद्र जाधव आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
पुरपाण्यासाठी तिसगावच्या शाळांना कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:34 PM