लोहोणेर : येथील गिरणा नदीकाठावरील हनुमान मंदिराचे तारेचे कुंपण रात्रीच्या वेळी अंधारात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तोडल्याने संताप व्यक्त होत आहे.सध्या लोहोणेर गावालगत गिरणा नदी पात्र कोरडे पडले असून, यामुळे वाळू उपशाला ऊत आला आहे. स्थानिक ट्रॅक्टरसह बाहेर गावातील ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करीत असून, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी रात्री याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू होता. पात्रात जाण्यासाठी रस्ता नसल्याने वाळू तस्करी करणाºया काही जणांनी चक्क येथील हनुमान मंदिराचे तारेचे कुंपण तोडून ट्रॅक्टर जाणे-येण्यासाठी रस्ता मोकळा करून घेतला. मात्र इतका प्रकार होऊनसुद्धा याकडे गावाने अथवा स्थानिक यंत्रणेने डोळेझाक केल्याने हनुमान मंदिर भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लोहोणेर येथील गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असून, याला संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याचे लोहोणेर गावात बोलले जात आहे. या वाळू तस्करीस वेळीच अटकाव न केल्यास मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाळू उपशासंदर्भात आवाज उठविणाºयाचा आवाज जाणीवपूर्वक दडपण्यात येतो. यामुळे येथील वाळू तस्करीस आळा घातला जात नाही, अशी प्रतिक्रिया काही भाविकांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
लोहोणेरला वाळूमाफियांकडून कुंपणाची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 8:48 PM