नाशिक - लोकशाहीचा उत्सव अर्थात लोकसभा निवडणुकीच्या राज्याच्या चौथ्या टप्प्यात नाशिक, दिंडोरी मतदारसंघात मतदान प्रक्रिया आज ( 29 एप्रिल) पार पडत आहेत. नाशिकमधून 18 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सकाळी सात वाजता शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला काही मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारीही पाहावयास मिळाल्या. मतदानापूर्वी मतदारांच्या घरपोच मतदार चिठ्ठीत मिळणे अपेक्षित होते; मात्र बहुतांश मतदारांना चिठ्ठी प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे केंद्रांवर गोंधळ उडाला. मतदारांचा उत्साह प्रचंड असला तरी शासकीय यंत्रणेच्या गलथान कारभाराचा फटका मतदारांना बसत आहे. सर्व मतदान केंद्रांवर मंडप, पाणी, व्हीलचेअर, सहायक उपलब्ध असून जेष्ठांसह दिव्यांगांना प्रथम प्राधान्य दिले जात आहेत.
आठवडाभरापासून नाशिकमध्ये उन्हाची प्रचंड तीव्रता वाढली असल्याने नागरिक दुपारी 12 च्या आधीच मतदानाचा हक्क बाजावण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सकाळी पहिल्या टप्प्यात शहर व परिसरातील मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे. मतदान प्रक्रियेच्या निमित्ताने शहरात मध्य प्रदेशविशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून आणि राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्यांसह एक प्लॅटून, असा मोठा विशेष फौजफाट्यासह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त पोलीस आयुक्तालय हद्दीत तैनात करण्यात येणार आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील चार मतदारसंघात एकूण एक हजार 217 बूथ असून, त्यामध्ये 1 हजार 106 मुख्य, तर 111 अॅक्झिलरी बूथ आहेत. त्यापैकी 48 बूथ संवेदनशील आहे. या बूथवर यापूर्वी निवडणूक काळात मतदानप्रक्रिया सुरू असताना कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता. यामुळे अशा बूथवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. कायदासुव्यवस्थेचा भंग करू पाहणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नसल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.
असा आहे बंदोबस्त
पोलीस आयुक्त : चार उपआयुक्त, नऊ सहायक आयुक्त, 44 पोलीस निरीक्षक, 160 उपनिरीक्षक, 2 हजार 575 पोलीस कॉन्स्टेबल, 666 गृहरक्षक दलाचे जवान, मध्य प्रदेश विशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या व 1 प्लॅटून, असा फौजफाटा असेल.