नाशिक - धुळे लोकसभा मतदार संघासाठी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांची जाहीर झालेली उमेदवारी, त्यानंतर डॉ. तुषार शेवाळे यांनी दिलेला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अन तातडीने चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांची झालेली त्या जागेवरील नियुक्ती या सर्व घडामोडींच्या पाश्व'भूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता काँग्रेस भवन येथे महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. थोरात यांचा दौरा प्रामुख्याने डॅमेज कंट्रोलसाठी असल्याचे मानले जात आहे.
बैठकीत विशेषत: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार आहे. काॅग्रेसच्या वाट्याला उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार या दोन जागा आल्या आहेत. त्यात धुळे येथे पक्षाने माजी मंत्री डाॅ.शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयानुसार ही उमेदवारीची सूचना असल्याचे पक्षाने जाहीर केले. असे असतानाही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष डाॅ.तुषार शेवाळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. पक्षानेही त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा दिला. डॉ. शेवाळे यांचा राजीनामा मंजूर करून घेत पक्षाने पक्षातंर्गत असलेल्या निष्क्रीय अन नाराजांनाही इशारा दिला. त्यानंतर चांदवडचे माजी आमदार शिरिष कोतवाल यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
बैठकीस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार अनिल आहेर, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश प्रवक्ते डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सचिव राहुल दिवे, माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, तसेच जिल्ह्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख, तसेच सर्व तालुका अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती शिरीष कोतवाल व शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.-----------कोतवाल यांचा पदग्रहण सोहळाथोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांचा पदग्रहण सोहळा होणार असून यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. नाशिक, दिंडोरी, धुळे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला थोरात मार्गदर्शन करणार आहेत.