संकेत शुक्ल
नाशिक : विविध संस्था संघटनांशी संवाद साधण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवाद बैठकांनी हेमंत गोडसे यांच्या खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे. हा संवाद गोडसे यांच्या लाभासाठी झाला असून, त्याचा खर्च गोडसे यांच्या खात्यावर टाकण्याच्या सूचना खर्च निरीक्षकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार गोडसे यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली. हा खर्च जर गोडसे यांच्या खात्यात गेला तर त्याचा लाखो रुपयांचा खर्च तसेच पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर सभांचा विभागून येणारा खर्च एकत्र केल्यास गोडसे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
निवडणुकीची रणधुमाळी गती घेत असतानाच उमेदवारांचा खर्चही वाढला आहे. आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेत खर्च होतो आहे की नाही, हे बघण्यासाठी दाखल झालेल्या निरीक्षकांपुढे मंगळवारी (दि. १४) द्वितीय तपासणी करण्यात आली. यासाठी नाशिक मतदारसंघातून ३१ पैकी २९ उमेदवारांनी हजेरी लावली. या खर्चात तफावत आढळलेल्या उमेदवारांना सुधारित अहवाल सादर करण्याची सूचना निरीक्षकांनी केली. तर गैरहजर राहिलेल्या भाग्यश्री अडसूळ (इंडियन पीपल्स अधिकार पार्टी) आणि कैलास चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दुसऱ्या खर्च तपासणीत हेमंत गोडसे अग्रस्थानी असून, त्याखालोखाल राजाभाऊ वाजेंनी खर्च केला असल्याचे समोर आले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष असलेले स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती आले आहेत.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकांबाबत खर्च निरीक्षकांनी महायुतीचे उमेदवार गोडसे यांना लाभार्थी केले आहे तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरात घेतलेल्या बैठकांच्या खर्चाबाबतही तपासणी सुरू असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये होती. खर्चात अडकली राज यांची सभा?
नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता एक सभा राज यांची घ्यावी यासाठी मनसे पदाधिकारी आग्रही आहेत. मात्र, वाढत्या खर्चात पंतप्रधानांच्या सभेसह इतर खर्च पाहता राज ठाकरे यांची सभा आयोजित करायची म्हणजे हा खर्च ९५ लाख रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. राज यांचा यंदा महायुतीला उघड पाठिंबा असल्याने त्यांची सभाही उमेदवाराच्याच खर्चात गणली जाईल. हा खर्च मर्यादेपलीकडे जाईल म्हणूनच राज यांच्या सभेला मुहूर्त लागत नसल्याची चर्चा आहे.