संकेत शुक्ल
नाशिक : २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानासाठी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील १२ विधानसभा क्षेत्रनिहाय ६ हजार ८०० बिलींग युनिटसह मतदान यंत्रांचे आज रविवारी (दि.१९) सकाळी ८ वाजताच वितरण सुरू झाले असून संबंधित ठिकाणच्या तहसील कार्यालयातून ती यंत्रे मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. यासाठी तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांसह दीड हजार वाहने कामाला जुंपण्यात आली असून सायंकाळपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर ही यंत्रे पोहोचलेली असतील.
१८ व्या लोकसभेसाठी पाचव्या टप्यात सोमवारी (दि. २०) मतदान होत असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रविवारी सकाळीच त्यासाठी कर्मचाऱ्यांसह मतदानाचे साहित्य शासकीय वाहनांतून बंदोबस्तातून रवाना होत आहे. नाशिक जिल्ह्यात ४ हजार मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये दिंडोरीसाठी १९२२ तर नाशिकसाठी १९१० मतदान केंद्र आहेत. त्या केंद्रांवर जाण्यासाठी केंद्रनिहाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाटणी झाली आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्री घरी परतून पुन्हा रविवारी मतदान केंद्रावर परतण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे याआधीच पोस्टल बॅलेटने मतदान झालेले आहे.२४ क्रिटिकल मतदान केंद्रे...
जिल्हातील अडीच लोकसभा मतदारसंघातून २४ केंद्रे क्रिटिकल जाहीर करण्यात आली आहेत. त्यात नाशिक (मध्य)- १७, येवला -३, इगतपुरी- ३, पेठ -१ यांचा समावेश आहे. त्याबाबत पोलिस व जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहेत.
टपाली मतदानाला प्रतिसाद...
जिल्हात वयोवृद्ध गटातील ८५ वर्षांच्या वरील ६५ हजार मतदार असून, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना घरून मतदान सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच दिव्यांग मतदारांनादेखील घरून मतदान करण्याची सुविधा मागितलेली आहे. याशिवाय सरकारी कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट मतदानाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्याद्वारेही हजारो मतदारांनी आपले मतदान नोंदवले आहे.