संकेत शुक्ल, नाशिक : कांदा विषयावर मत मागायचे तर स्वतंत्र सभा घ्या. तुमच्या व्यासपीठावरून तो प्रश्न मांडा. पंतप्रधानांच्या सभेत येत गोंधळ घालण्याचा हा प्रकार शरद पवार यांच्यासारख्या जुन्या नेत्याकडून अपेक्षित नाही. ती आपली संस्कृती नाही, असा टोला राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी लगावला.
दोन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
पिंपळगाव बसवंत येथे आयोजित मोदी यांच्या सभेत झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कांद्याबद्दल भावना व्यक्त करणे गैर नाही. मात्र, दुसऱ्याच्या कार्यक्रमात असा गोंधळ चांगला नाही. पवार यांच्यासारख्या नेत्याकडून त्या कार्यकर्त्यांची पाठराखण करण्याचा प्रकारही योग्य नाही. राज ठाकरे आमच्यासोबत आल्यामुळे काहींना पोटदुखी झाली आहे. त्यातून वडेट्टीवार यांनी राज यांच्यावर आरोप केले होते. तसेच अजित दादा आजारी आहेत. त्यामुळे ते प्रचाराला आले नाहीत. ते नाराज असल्याच्या वृत्ताचाही महाजन यांनी इन्कार केला.
उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहे. ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या पायऱ्या चढल्या नाहीत, त्यांनी कारभार शिकविणे म्हणजे आपल्या हाताने आपली पाठ थोपटून घेण्यासारखे असल्याचेही महाजन म्हणाले. शांतिगिरी महाराजांविषयी बोलताना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. नाशिकमधून लढण्याची त्यांची पूर्ण तयारी असल्याने त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. इतर ठिकाणी मात्र ते आमच्यासोबत असल्याचा दावाही महाजन यांनी केला. तत्पूर्वी महाजन आणि भुजबळ यांनी तब्बल दीड तास चर्चा करीत दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला.
भुजबळ नाराज नाहीत...
छगन भुजबळ नाराज असल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. महायुतीच्या प्रचारात ते सहभागी आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेत त्यांनी केलेले भाषण तडाखेबंद झाले. गडकरी यांच्या सभेतही ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत असे कसे म्हणता येईल? असा प्रश्नही महाजन यांनी विचारला.
तुम्ही तुमची काळजी करा...
चार जूननंतर महायुतीतील अनेक नेते आमच्याकडे येतील. तटकरे आणि शरद पवार एकाच हॉटेलमध्ये असल्याने त्याचीच चर्चा असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केल्यानंतर देशमुख तरी त्यांच्या पक्षात स्थीर आहेत का हे त्यांनी पाहावे. आमच्याकडून तर कोणी तिकडे जाणार नाही. त्यांच्याकडील उरलेले राहतील का, याची काळजी त्यांनी घ्यावी, असा टोला भुजबळ यांनी देशमुख यांना लगावला.