धनंजय वाखारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पहिल्याच टर्ममध्ये अनपेक्षितपणे केंद्रीय राज्यमंत्रिपद पदरात पडलेल्या विद्यमान खासदार व महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार व पेशाने शिक्षक असलेले भास्कर भगरे यांनी आव्हान उभे केले आहे. रिंगणात दहा उमेदवार असले तरी पवार विरुद्ध भगरे असाच सरळ सामना बघायला मिळणार आहे. ‘वंचित’च्या उमेदवार मालती थविल यांच्यामुळे मतविभागणी होऊ शकते.
भारती पवार यांना महायुतीतील मित्रपक्षांचे पाठबळ लाभले आहे. त्यात अजित पवार गटाचे हेवीवेट नेते व मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर भास्कर भगरे यांच्या पाठीशी शरद पवार यांच्या निष्ठावान शिलेदारांसह उद्धवसेना व काँग्रेस उभी आहे. मतदारसंघात कांदाप्रश्न हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनला आहे.
सहाही मतदारसंघांत महायुतीचे आमदार
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे पारडे जड दिसत असले तरी शरद पवार गटाच्या बाजूने माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनीही ताकद पणाला लावली आहे.
मोदींची गॅरंटी अन्...
घटक पक्षांची साथ, मोदींची गॅरंटी ही डॉ. पवार यांची जमेची बाजू. मात्र, कांदाप्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरू शकते. स्वच्छ प्रतिमा, नवा चेहरा ही भास्कर भगरेंची जमेची बाजू; परंतु अपुरी यंत्रणा व घटक पक्षांची तटस्थता अडचणीत आणू शकतात.
बंडखोरांच्या माघारीमुळे मतविभागणी टळली
महाविकास आघाडीतील माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित तर मतदारसंघाचे यापूर्वी तीन वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्याने मतविभागणी टळणार आहे. त्याचा फायदा कुणाला होतो हे कळेलच.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता निर्यात खुली करण्यात आली असली तरी किमान निर्यात मूल्य व ४० टक्के ड्यूटीमुळे नाराजी कमी झालेली नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपद हाती असतानाही आदिवासीबहुल भागात वैद्यकीय सोयीसुविधांचा असलेला अभाव. आदिवासींचे स्थलांतर रोखण्यात अपयश तसेच पिण्याच्या पाण्याचा जटिल प्रश्न कायम. बहुचर्चित नार-पार प्रकल्पाबाबतचे भिजत घोंगडे.
२०१९ मध्ये काय घडले?
उमेदवार पक्ष मतेडॉ. भारती पवार भाजप (विजयी) ५,६७,४७०धनराज महाले राष्ट्रवादी ३,६८,६९१जे. पी. गावित माकप १,०९,५७०बापू बर्डे वंचित ५८,८४७