काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान किशोरीलाल शर्मा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गांधी कुटुंबाचा निर्णयाचं मी पालन करणार असल्याचं शर्मा यांनी म्हटलं आहे. CNN-News18 या इंग्रजी वेबसाइटनुसार केएल शर्मा म्हणाले की, मी गांधी कुटुंबाच्या निर्णयाचा आदर करतो. मी कोणत्याही अर्थाने कमकुवत उमेदवार नाही."
स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत आहे असं म्हणत आव्हान दिलं आहे. तसेच "मी गेल्या 40 वर्षांपासून या क्षेत्राची सेवा करत असल्याचं म्हटलं आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीबद्दल काँग्रेस नेते केएल शर्मा यांनी "मला निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानू इच्छितो" असंही सांगितलं. य़ासोबतच राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवत असल्याबद्दल केएल शर्मा म्हणाले की, ते मैदानातून पळून जाणारे नाहीत. मतदानाबद्दल कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही. मी आज प्रियंका गांधींना भेटणार आहे"
याआधी काँग्रेसने शुक्रवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, गांधी घराण्याचे जवळचे सहकारी किशोरीलाल शर्मा यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शर्मा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सात टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स संपवत पक्षाने शुक्रवारी दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केले.