नाशिक : सकाळी ८ पासून लागलेल्या मतदानाच्या रांगांमध्ये दुपारी १ च्या सुमारास काहीशी घट आल्याचे दिसून येत होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदारांनी दुपारी १ च्या आसपास मतदार येण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. त्यामुळे सकाळपासून दुपारी १ पर्यंत सरासरी २६ टक्के झालेल्या मतदानात केवळ ११ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
सोमवारी (दि. २०) उन्हाचा तडाखा वाढण्याच्या शक्यतेने नागरिकांनी सकाळपासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. विशेषत्वे सहकुटुंब मतदान करणाऱ्यांचे प्रमाण सकाळपासूनच अधिक होते. सकाळपासूनच्या मतदानात ज्येष्ठ नागरिकांचादेखील मोठा भरणा होता. त्याशिवाय दिव्यांग मतदारांनीही सकाळीच लवकर मतदान करुन आपले कर्तव्य बजावले. मात्र, दुपारी बारानंतर हळूहळू मतदारांच्या रांगांमध्ये घट येऊ लागली. दुपारी टक्केवारीत झालेली ही घट अल्पशीच होती. मात्र, दुपारी २.३० नंतर पुन्हा मतदार मतदान केंद्रांकडे वळू लागले. त्यामुळे मतदानाच्या प्रमाणात पुन्हा वाढ होऊ लागली. मात्र, दुपारच्या दीड ते दोन तासाच्या उन्हाच्या तडाख्याने मतदानाचा टक्का काहीसा कमी झाला.