नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या शुक्रवारी (दि. २६) खऱ्या अर्थाने बिगुल वाजणार असून, त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दालन सुरू करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते दुपारी ३ यादरम्यान त्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाचव्या टप्प्यात होणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र घेऊन ते सादर करण्यासाठी ३ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यादरम्यान तब्बल तीन सार्वजनिक सुट्या असल्याने २ आणि ३ मे रोजी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उमेदवारांनाही केवळ ४ समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.