लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला भरभरून मते देणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदाही सेनेला सुमारे ६५ हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवून दिल्याने या मतदारसंघावर युतीचे वर्चस्व सिद्ध झाले असले तरी, सध्या या मतदारसंघाचे भाजपाकडून प्रतिनिधीत्व केले जात असल्याने लोकसभेसाठी सेनेला जवळ करणाºया या मतदारसंघाने विधानसभेसाठी भाजपाला बळकटी दिली आहे.पंचवटी व नाशिकरोड अशा शहरी भागांचा समावेश असलेल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाने एकदा मनसे व त्यापाठोपाठ भाजपाला साथ दिली आहे. सध्या भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असून, गेल्या निवडणुकीत सेना विरुद्ध भाजपा, असा सामना होवून त्यात भाजपाने बाजी मारली होती. त्यामुळे यंदा युती झाल्याने भाजपाच्याच वाट्याला हा मतदारसंघ जाईल असे मानले जात असले तरी, शिवसेनादेखील या मतदारसंघावरील आपला दावा सहजासहजी सोडेल असे वाटत नाही. नाशिकरोड भागात कायमच शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. परंतु महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाने भाजपाला साथ दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपा दावा ठोकेल हे जितके सत्य आहे, तितकेच या मतदारसंघात भाजपांतर्गत उमेदवारीसाठी दावेदारांची संख्या वाढेल याचे संकेत आत्तापासूनच मिळू लागले आहेत. लोकसभेचा निकाल पाहताल, विधानसभा निवडणुकीत यश मिळविणे भाजपाला अधिक सोपे वाटू लागणे साहजिकच असले तरी, उमेदवार कोण याची चर्चा आत्तापासूनच झडू लागली आहे.भाजपातही अनेक इच्छुकविद्यमान आमदार बाळासाहेब सानप हे शहराध्यक्ष असल्याने व त्यांचे पक्षश्रेष्ठींशी असलेले संबंध पाहता, ते उमेदवारीसाठी पहिले दावेदार ठरू शकत असले तरी, त्याव्यतिरिक्त महापौर रंजना भानसी, नगरसेवक उद्धव निमसे, गणेश गिते यांच्या नावांची चर्चा होत आहे. यातील निमसे व गिते यांनी गेल्या वर्षभरापासूनच विधानसभेच्या दृष्टीने आपली तयारी चालविली असून, त्यात प्रामुख्याने सानप यांच्या विरोधात पक्षांतर्गंत व मतदारांमध्ये असलेली नाराजीवरच या दोघांच्या उमेदवारीसाठी दावा आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीला कमी मते मिळाल्याने विरोधकांना हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मते सेनेला, पण भाजपाचा दावा बळकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:06 AM