नाशिक : विलोभनीय लाइट-शोचा झगमगाट, फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत, तरुणाईचे बहारदार समूह नृत्य अन् बॅण्ड पथकासह संघांतील खेळाडूंच्या संचलनाने क्रिकेटचा महासंग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोकमत’ एनपीएलच्या सीझन-६चे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सीझन-६ या क्रिकेट महासंग्रामाला बुधवारपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मान्यवरांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फु गे सोडून व ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रारंभ झाला. संघमालक व संघातील खेळाडूंचा या सोहळ्यात विशेष सत्कार करून उद्घाटनानंतर या महोत्सवातील पहिला सामना भदाणेज् हायटेक टायगर्स आणि संदीप फालक न्स या दोन संघात सुरू झाला. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे व डॉ.सुधीर तांबे, महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, नेक्सा मारुती सुझुकीचे विभागीय व्यवस्थापक मोहित जिंदाल, अशोका समुहाचे चेअरमनअशोक कटारिया, फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रतन लथ, एक्स्प्रेस इन हॉटेलचे व्यवस्थापक विकास शेलार, बॉशचे टेक्निकल हेड अविनाश चिंतावार, राजुरी स्टीलचे मुख्य वितरक मनू चांदवानी, हेमंत कोठावदे व प्रकाश पटेल, राजेंद्र बागड, सचिन बागड आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक म्हणाले की, ‘लोकमत’ने दर्जेदार बातम्या व त्यामागील विश्लेषण देताना नाशिकच्या तरुणांना क्रिकेटचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नाशिक महानगराचे नाव या स्पर्धेमुळे देशपातळीवर उंचावले आहे. या स्पर्धेतून पुढे प्रगती करणारे खेळाडू देशपातळीवरील विविध मानाच्या स्पर्धा खेळतात. त्यांचा खेळाचा दर्जा बघून हा नाशिकचा खेळाडू म्हणून उल्लेख होऊन लोकमत एनपीएलचे नाव घेतले जाते. यातच लोकमत व नाशिककरांचे यश सामावले असल्याचे ते म्हणाले. रतन लथ यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना लोकमतच्या एनपीएल क्रिकेट महोत्सव आयोजनाचे कौतुक केले. गेल्या सहा वर्षांपासून सतत हा महोत्सव आयोजित करून नाशिकच्या खेळाडूंना देशपातळीवर ‘स्टार’ तयार करण्याचे काम एनपीएल क्रिकेट महोत्सव करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल म्हणाले , या स्पर्धेनिमित्त नाशिकच्या खेळाडूंना दर्जेदार क्रिकेटचे मैदान उपलब्ध होत असते. खेळाडूंनी वर्षभर मेहनत घेऊन या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघात आपले नाव कसे घेतले जाईल, या दृष्टीने प्रयत्न करावा असे आवाहन सिंघल यांनी नाशिकच्या खेळाडूंना केले. प्रारंभी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
लोकमत एनपीएल क्रिकेट महासंग्रामाला शानदार प्रारंभ
By admin | Published: December 22, 2016 12:49 AM