नवी दिल्ली : नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील म्हैसमाळा येथे एका विहिरीत खड्डे खोदून त्यात जमा होणाऱ्या पाण्यावर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत होती. ‘लोकमत’नाशिकचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी काढलेल्या या विहिरीच्या छायाचित्राला नवी दिल्ली येथे शुक्रवारी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.द प्रेस इन्स्टिट्युट आॅफ इंडिया, चेन्नई (पीआयआय) आणि इंटरनॅशनल कमिटी आॅफ द रेड क्रॉस (आयसीआरसी) यांच्या वतीने येथे आयोजित १३व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात छायाचित्रकार खरोटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. २० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. ‘हवामान बदलाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम’ हा या स्पर्धेचा विषय होता. खरोटे यांना आतापर्यंत तीनवेळा आंतरराष्ट्रीय आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
‘लोकमत’च्या पाणीटंचाईवरील छायाचित्राला विशेष पुरस्कार, छायाचित्रकार प्रशांत खारोटे यांना सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 5:18 AM