नाशिक : बाबाज् थिएटर्स आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. ७) पासून लोकोत्सव २०२१ सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. त्यानिमित्ताने आठवडाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे बाबाजचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे आणि किशोर बागुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प.सा. नाट्यगृहात सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी ६ वाजता होतील. रविवारी रंग मऱ्हाटमोळा हा लोकसंगीताचा कार्यक्रम, सोमवारी (दि. ८) बॉलिवूड हिट्स हा हिंदी गीतांचा कार्यक्रम तर मंगळवारी (दि.९ ) बाबाज् थिएटर्स निर्मित ‘आपली आवड’ ही सुरेल संगीताची मैफल सजणार आहे. संगीत संयोजन अमोल पाळेकर यांचे असून, सारेगमपमधील चैतन्य कुलकर्णी व श्रावणी महाजन सहभागी होणार आहेत. बुधवारी (दि.१०) उत्सव या कार्यक्रमात कलाकारांशी थेट संवाद साधता येईल. या सोहोळ्याचे खास आकर्षण म्हणजे मालिका माझा होशील ना, यातील कलाकार आदित्य व सई उपस्थित राहणार आहेत. सोबत लेखक व निर्माते सुबोध खानोलकर हेदेखील नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. गत २० वर्षांपासून बाबाज् करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यांत येते. त्याप्रमाणे यंदा ११ ते १३ दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत स्पर्धा होणार आहेत. नाशिककरांनी या विनामूल्य सोहोळयाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी राजेश पिंगळे, विजय निकम, किसन बल्लाळ, अमोल पाळेकर, प्रवीण कांबळे, जगदीश जंगम, विजय राजेभोसले, विक्रम बल्लाळ, कैलास पाटील आदी संयोजक उपस्थित होते.