नाशिक - Girish Mahajan on Chhagan Bhujbal ( Marathi News ) महायुतीतील तीनही पक्षांना नाशिकची जागा हवी आहे. तसे वागणे स्वाभाविक आहे. शिंदे सेनेकडे सध्या जागा आहे, राष्ट्रवादीलाही जागा हवी आहे आणि नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने आम्हालाही ही जागा हवी आहे. मात्र, त्याबाबत पार्लमेंटरी बोर्डात जो निर्णय होईल तो अंतिम असेल, भुजबळ यांना कोणी शब्द दिला असेल तर त्याबाबत मला माहिती नाही, प्रसंगी हक्क सांगणाऱ्यांनाही आपला हक्क सोडावा लागेल, असे सूचक वक्तव्य नेते आ. गिरीश महाजन यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.३१) भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नाशिकमध्ये भाजपचे संख्याबळ जास्त आहे. तीन आमदार, ७० नगरसेवक आणि इतर बलाबल पाहता नाशिक आमचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट होते. नाशिकबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यासाठी चर्चा सुरू आहे. पार्लमेंटरी बोर्डही त्यात मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतरच जागेचा वाद सुटू शकेल. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याबाबत मला माहिती नाही. पार्लमेंटरी बोर्डात काय चर्चा झाली त्यांना कोणी सांगितलं? एक-दोन दिवसांत अंतिम यादी येईल. त्यानंतरच नाव जाहीर होईल, असेही महाजन म्हणाले.
जनताच ठाकरे यांना पिक्चर दाखवेलउद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, उद्धव यांनी आता त्यांच्या पक्षाचा विचार करावा. कोणाला कोणता पिक्चर दाखवायचा ते नंतर बघा, निवडणुकीत जनता तुम्हालाच पिक्चर दाखवण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात फिरा म्हणजे समजेल असे ते म्हणाले. ठाकरे सेनेतील आमदार आमच्याकडे आले तेव्हा ते भ्रष्ट होते का? असे आरोप बालिश असल्याची टीकाही महाजन यांनी केली. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.