लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पूर्ण क्षमतेने प्रवासी बसवाहतूक सुरू केल्यानंतर ओझरसह परिसरासाठी असलेल्या नवीन स्थानकात रोज सरासरी ५५ ते ६० एसटीच्या साध्या बसेस नियमित येत आहेत. त्यात पिंपळगाव, सटाणा, मालेगाव, नांदगाव, मनमाड नंदुरबार या गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसची जास्त वेळ वाट बघावी लागत नाही; मात्र लासलगावकडे जाणारी एकही बस स्थानकात येत नाही, तसेच मालेगाव (जलद), धुळे, नंदुरबार, शिरपूर, जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडासह इतर ठिकाणी जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या बसेसचे चालक-वाहक बस स्थानकात न आणता सर्व्हिस रोडवर गडाख काॅर्नरसमोर किंवा नवीन स्थानकासमोर थांबवून प्रवाशांना उतरवून देतात व रस्त्यावर थांबलेल्या प्रवाशांना बसमध्ये घेतले जाते. पिंपळगाव बाजूकडील जवळच्या किंवा लांब पल्ल्याच्या गावाला जाण्यासाठी प्रवाशांना बसस्थानकात जाण्यासाठी कुठलाही जवळचा रस्ता नसल्यामुळे गडाख काॅर्नरसमोरील बोगदामार्गे सर्व्हिस रोडने १ किलोमीटर पायपीट करत जावे लागत आहे. नवीन स्थानकाचा वापर हा लांब पल्ल्याच्या बससाठीसुद्धा व्हावा. यामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, सटाणा, साक्री, शिंदखेडा, शिरपूर, अमळनेर, अमरावती या बसेस स्थानकात आणाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
कोट....
ओझर येथील नवीन स्थानकात पिंपळगाव, मालेगाव, सटाणा, नांदगाव, मनमाडकडे जाणाऱ्या बसेस येत आहेत, त्यामुळे प्रवाशांना व नागरिकांना दिलासा मिळत आहे; परंतु लांब पल्ल्याच्या बसही आल्या पाहिजे. धुळे, शिरपूर, अमळनेर, जळगाव, शिंदखेडा, नंदुरबार, चाळीसगाव, आदी बसेसनाही नवीन स्थानकात थांबा मिळावा.
- अजयकुमार सोनवणे, प्रवासी, ओझर
कोट....
नवीन स्थानकात रोज सरासरी ५५ ते ६० साध्या बसेस येतात. त्यामध्ये पिंपळगाव डेपो ११, मनमाड ७, नांदगाव ११, सटाणा ८, मालेगाव ५, नंदुरबार ७ व नाशिक डेपोच्या ७ बसेसचा समावेश आहे. एखाद्या वेळी संख्या अधिकसुद्धा होते. प्रवासी स्थानकात आल्यानंतर काही वेळेतच बस उपलब्ध होत असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करतात.
- एस. के. महाले. वाहतूक नियंत्रक, नवीन बसस्थानक, ओझर
कोट...
सर्व्हिस रोडनेच सर्व बसेस आल्या पाहिजे, याचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून दहावा मैल, रिलायन्स पंप व मेनगेट पुलाजवळ कर्मचारी ठेवले असून, ते दिवसभरात सर्व्हिस रोडने येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व बसेसची नोंद ठेवतात.
- विजय निकम,
आगार व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत
फोटो- ०९ ओझर बस
090721\582009nsk_17_09072021_13.jpg
फोटो- ०९ ओझर बस