नाशिक : जग २१व्या शतकात गेले आणि तुम्ही अजूनही पारंपरिक कामकाजात अडकले आहात. राज्यातील सर्वाधिक अस्वच्छ जिल्हा परिषद नाशिकची आहे. महिन्याभरात फायलींचा निपटारा करून संगणकीकृत कामकाज करण्यास प्राधान्य द्या. इमारतीला रंगरंगोटी द्या, स्वच्छता ठेवा, अशा कानपिचक्या पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोेणीकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिल्या.दुपारी ४च्या दरम्यान अचानक बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. अध्यक्ष शीतल सांगळे तसेच बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार, रत्नाकर पवार, उदय सांगळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी मुख्य इमारतीतील पदाधिकाºयांच्या कक्षाबाहेरील इमारतीला लागलेली गळती व अस्वच्छता पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांना त्वरित याबाबत स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले. बांधकाम विभाग एकला त्यांनी भेट दिली असता विभागात सर्व कर्मचाºयांच्या पुढे फायलींचे ढिगारे लाल कापडात बांधून ठेवलेले दिसले. त्यावेळी त्यांनी सर्व खातेप्रमुख व कर्मचाºयांना तेथेच बोलावून मार्गदर्शन केले. लग्नाला बांधतात तसे लाल कपड्यात हे बस्ते का बांधले, याचा जाब त्यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांना विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान छेडले असून, गावागावात स्वच्छ भारत अभियानातून गावे विकसित व स्वच्छ करण्यात येत आहेत. तसेच सरकारी कार्यालयातही स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण घेतल्याचे बबनराव लोणीकर यांनी सांगितले. आपण विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालयांना भेटी दिल्या. आता जिल्हा परिषदेत भेट दिली असता येथे स्वच्छतेचा अभाव असल्याचे सांगितले. नाशिक जिल्हा परिषद राज्यातील सर्वांत अस्वच्छ इमारत असल्याचे आज जाणवले. महिनाभरात स्वच्छता मोहीम राबवून इमारतीला रंगरंगोटी द्या, असे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष शीतल सांगळे, बांधकाम सभापती मनीषा पवार, शिक्षण सभापती यतिन पगार जि.प. सदस्य अशोक टोंगारे, दीपक शिरसाट आदी उपस्थित होते.
लोणीकरांच्या कानपिचक्या : जिल्हा परिषदेला अचानक भेट लग्नाचे बस्ते आवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:55 PM