लोहोणेर : येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन दिवसांपासून देवळा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि .१९) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा चार ट्रॅक्टर्ससह गौणखनिज असा एकूण १६ लाख ६२ हजार रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.ट्रॅक्टरच्या फरार चार मालकांवर गौणखनिज प्रतिबंधक कायदा तसेच पर्यावरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिली. तीन दिवसांपूर्वी लोहोणेर येथील तीन ट्रॅक्टरसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या देवळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असताना वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्रीच्या सुमारास देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पुन्हा चार अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टर्सवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आहे; मात्र अंधाराचा फायदा घेऊन चारही संशयित फरार झाले असले तरी त्यांची नावे पोलीस ठाण्याला प्राप्त झाली असून, विजय ऊर्फ बबल्या पोपट अहिरे व रवींद्र बारकू निकम (दोघे, रा. आराई), जगन ऊर्फ दादा बापू महाले व तुळशीराम गंगाराम अहिरे (दोघे, रा. ठेंगोडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतल्याने वाळूमाफियांना जबर चपराक बसली आहे. या पूर्वी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते सर्व फरार संशयित अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात पोलीस कर्मचारी भाऊसाहेब अहिरे , नीलेश सावकार, विजय मल्ले, सुदर्शन गायकवाड आदिंचा समावेश होता. (वार्ताहर)
लोहोणेरला चार ट्रॅक्टर्ससह गौणखनिज जप्त
By admin | Published: February 20, 2016 10:23 PM