नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून शिकण्याची गरज आज समाजाला आहे. समाजाने सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघावे, असे प्रतिपादन विचारवंत विवेक घळसासी यांनी केले.पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प घळसासी यांनी शनिवारी (दि.१४) ‘रामायण नव्हे सीतायन’ या विषयावर गुंफले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, विजय साने, मंगला जोशी आदी उपस्थित होते. यावेळी घळसासी यांनी समाजाची घसरलेली वैचारिक अवस्था, रामायणातील मूल्य आणि प्रबोधनाचा मांडलेला बाजार यावर भाष्य केले. ते म्हणाले, सुखी संसारासाठी शुद्ध शील-चारित्र्य आवश्यक असते. चारित्र्यवान स्त्री ही कुटुंबातील सर्व पुरुषांना चांगल्या मार्गावर नेऊ शकते.समाजाला रामायणातील नीतिमूल्यांचे संस्कार देण्याची जबाबदारी शिक्षक, प्रबोधनकारांची आहे, हे लक्षात घ्यावे. रामायणातून मर्यादा हा गुण आत्मसात केल्यास नक्कीच व्यक्तिमत्त्वाला श्रेष्ठत्व लाभेल; मात्र याकडे समाज दुर्लक्ष करतो आणि ‘संजू’सारख्या सिनेमाला गर्दी करतो, अशी टीकादेखील त्यांनी बोलताना केली.
सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघा - घळसासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:24 AM