लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने पहिल्या यादीत विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांचीच उमेदवारी घोषित केल्याने अन्य इच्छुक असलेल्या डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे. त्यातच, कॉँग्रेसने माजी आमदार शिरीष कोतवाल यांनाच पसंती दिल्याने प्रादेशिक स्पिरीट जागृत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.चांदवड-देवळा मतदारसंघात नेहमीच प्रादेशिक अस्मितेचा वाद झडत आला आहे. विद्यमान आमदार आहेर यांनी यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला; पण भाजपमध्येच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षनेतृत्वाच्या निर्णयाकडे लक्ष लागून होते. मात्र, भाजपने पहिल्याच यादीत आहेर यांचे नाव निश्चित केल्याने इच्छुकांच्या भूमिकेबाबत औत्सुक्य वाढले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत आत्माराम कुंभार्डे हे राहुल आहेर यांच्या सोबत विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात हजर राहत आहेर यांच्या कार्याची प्रशंसा करताना दिसून आले.अगदी उमेदवारी जाहीर होईपर्यंत ते आहेर यांच्यासोबत व्यासपीठांवर एकत्र दिसून आले, तर भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि चांदवडचे तीनवेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार जयचंद कासलीवाल यांचे चिरंजीव व चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे मात्र आहेर यांच्या कार्यक्रमांपासून अंतर राखून होते. अशातच भाजपने पुन्हा एकदा आहेर यांच्याच झोळीत उमेदवारी टाकल्याने हे दोन्ही दावेदार आता नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.त्यात कॉँग्रेसने चांदवडमधील स्थानिक माजी आमदार शिरीष कोतवाल यांना उमेदवारी घोषित केल्याने प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा अधिक टोकदार बनण्याची चिन्हे आहेत. याच मुद्द्यातून भाजपमधील इच्छुकांपैकी एकाचे यापूर्वी कोतवालांशी असलेले मधुर संबंध व दुसऱ्याचे स्थानिक नगर परिषदेतले संबंध पाहता त्याचा लाभ कोतवालांना होण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधील दोन्हीही इच्छुक चांदवडमधील असल्याने देवळा सांभाळतानाच चांदवडमधील मतांचा टक्का टिकवून ठेवण्याचे आव्हान राहुल आहेर यांच्यासमोर असणार आहे. बंडाचे निशाण कोणाच्या हाती?मागील निवडणुकीत भाजपचे डॉ. राहुल आहेर यांना ५४ हजार ९४६ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे उमेदवार शिरीष कोतवाल यांनी ४३ हजार ७८५ मते घेतली होती. तर डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी अपक्ष उमेदवारी करताना २९ हजार ४०९ मते घेतली होती. कुंभार्डे नंतर भाजपत गेल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक होते. आता राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कुंभार्डे यांच्यासह कासलीवाल यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, बंडाचे निशाण कोण फडकावतो, याकडे लक्ष लागून आहे.
आहेर यांच्या उमेदवारीमुळे अन्य इच्छुकांच्या भूमिकांकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 1:20 AM
नाशिक : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने पहिल्या यादीत विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांचीच उमेदवारी घोषित केल्याने अन्य इच्छुक असलेल्या डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे. त्यातच, कॉँग्रेसने माजी आमदार शिरीष कोतवाल यांनाच पसंती दिल्याने प्रादेशिक स्पिरीट जागृत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देचांदवड मतदारसंघ : प्रादेशिक स्पिरीट जागृत होण्याची शक्यता