नाशिक : महापालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा होणारा प्रभावी वापर लक्षात घेता निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारावर करडी नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल निर्माण केला असून, प्रचारासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही परवानगी घ्यावी लागणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. निवडणुकीच्या आचारसंहितेविषयी माहिती देताना अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, सोशल मीडियावरून उमेदवारांकडून आक्षेपार्ह मजकूर अथवा क्लीप प्रसारित झाल्यास आचारसंहितेचा भंग होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, रेडिओवर दिल्या जाणाऱ्या जाहिराती यांसह सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या निवडणूक प्रचाराविषयक मजकुरासाठी संबंधिताना निवडणूक कक्षाकडून रीतसर परवानगीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. विनापरवानगी सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचा अथवा स्वरूपात प्रचार करता येणार नाही. सोशल मीडियावरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी खास स्वतंत्र सेल कार्यरत असणार असल्याची माहितीही अभिषेक कृष्ण यांनी दिली. उमेदवारांसाठी यंदा प्रथमच आॅनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, उमेदवारांना आॅनलाइन अर्ज मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवाराने सदर आॅनलाइन अर्जाची प्रिंट कॉपी दि. २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या कालावधीत सकाळी ११ ते ३ या वेळेत त्या-त्या विभागातील निवडणूक आयोगाकडे सादर करावयाची आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चही आॅनलाइन सादर करण्यासाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराचे खास निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बॅँक खाते उघडावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी आचारसंहिता कक्षप्रमुख सरिता नरके, सहनिवडणूक अधिकारी विजय पगार, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावरही करडी नजर
By admin | Published: January 16, 2017 11:58 PM