नाशिक : आडत व तोलाई प्रश्नावर कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची घोषणा केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सटाणा व येवला येथे रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सहकारमंत्र्यांनी पणन सचिवांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर दुपारनंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले. येवला : शेतमालाच्या खरेदी-विक्रीतून आडत वसुली बंद करण्याच्या पणनचे संचालक सुभाष माने यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद आज येवला बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले. नांदगाव, भवरी, वैजापूरसह येवला तालुक्याच्या आसपासच्या परिसरातून शेतकऱ्यांनी सुमारे २०० टॅ्रक्टर कांदा लिलावासाठी आणला होता; परंतु लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. एकतर उत्पादित मालाला निर्यातबंदीमुळे भाव मिळत नाही. त्यातच गारपिटीने झालेले नुकसान यामुळे बाजार समितीत आणलेल्या मालावरच शेतकऱ्यांची मदार असल्याने या निर्णयामुळे शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून नगर-मनमाड महामार्ग काही काळ बंद केला. पोलिसांच्या व शेतकरी संघटनेचे नेते संतू झांबरे यांच्या मध्यस्थीने हा रास्ता रोको थांबवण्यात आला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, आज नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार छगन भुजबळ यांनी सदर मुद्दा उपस्थित केल्यानंतर, या निर्णयावर १५ दिवसांत योग्य निर्णय घेण्यात येईल, बाजार समित्या तत्काळ सुरू करण्यात याव्यात, असे आदेश पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. या आदेशानंतर दुपारनंतर लिलाव पूर्ववत सुरू झाले. सटाणा : पणनने जारी केलेल्या आदेशाला सटाण्याच्या व्यापाऱ्यांनी अचानक लिलाव बंद पाडून विरोध दर्शविल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करावा म्हणून मालेगावरोडवर तीन वेळा चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल माघारी परत न्यावा लागला. काही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा फायदा घेऊन बाजार समितीबाहेर मातीमोल भावाने डाळींब खरेदी केल्याचे चित्र काल बघायला मिळाले. सकाळी सटाणा बाजार समिती आवारात डाळींब, मका व कांद्याची तीनशे ते साडेतीनशे वाहने आवक होती; मात्र सकाळी दहा वाजता डाळींब, कांदा आणि भुसार व्यापाऱ्यांनी आडतसंदर्भात बेमुदत लिलाव बंदचे फलक लावून पणन संचालकांच्या आदेशाला कडाडून विरोध केला. शेतमाल व्यापारी वर्धमान लुंकड, अशोक निकम, जयप्रकाश सोनवणे, संदीप देवरे, राजेद्र खैरनार, धनंजय सोनवणे, बिंदुशेठ शर्मा, काका रौंदळ, श्रीधर कोठावदे, राजाराम सोनवणे, बापू गहिवड आदिंनी बाजार समितीचे प्रशासक चंद्रकांत विघ्ने यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. देवमामलेदारांच्या यात्रेनिमित्त सटाणा बाजार समितीला १८ डिसेंबरपासून सुट्या होत्या. सोमवारी बाजार समिती सुरू राहील म्हणून रविवार सायंकाळपासूनच शेतमालाची आवक सुरू झाली; मात्र व्यापाऱ्यांनी अचानक लिलाव बंदची भूमिका घेतल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत मालेगाव-सुरत राज्य मार्गावर ठिय्या देऊन तीन वेळा चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला म्हणून शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक भागवत जायभावे यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि शेतकऱ्यांची समजूत काढून शांत केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घेतला. वाहन भाडे खर्चून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला होता; मात्र लिलाव न झाल्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. लिलाव बंद असल्याचा फायदा घेऊन परप्रांतीय व्यापाऱ्यांनी हजार रुपये क्रेट विकले जाणारे डाळींब तीनशे ते चारशे रुपयांनी खरेदी केल्याचे चित्र बघायला मिळाले. (वार्ताहर)
आडत वसुली : व्यापाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या लिलाव बंदमुळे संताप
By admin | Published: December 22, 2014 11:17 PM