इंदिरानगर : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने लुटल्याची घटना पाडव्याच्या दिवशी बापू बंगल्यासमोरील रस्त्यावर घडली़ तोतया पोलिसांकडून ज्येष्ठांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे़सिद्धिविनायक सोसायटीतील रहिवासी अरविंद पाटील (६०) हे गुरुवारी (दि़१२) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घरी परतत होते़ बापू बंगल्यासमोरील रस्त्याने येत असताना दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी पुढे तपासणी सुरू असून, सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी केली़ यानंतर पाटील यांना हातातील अंगठ्या व गळ्यातील सोनसाखळी काढून ठेवण्याची सूचना केली़ यावेळी त्यांचाच एक साथीदार हातात बॅग घेऊन आल्यानंतर तपासणीच्या नावाखाली त्यास दोन-चार फटके लावले़ या घटनेमुळे घाबरलेल्या पाटील यांनी हातातील सोन्याच्या अंगठ्या तसेच गळ्यातील साखळी काढून खिशात ठेवली असता तोतया अधिकाऱ्यांनी हे दागिने व्यवस्थित ठेवले की नाही हे पाहण्याच्या बहाण्याने सुमारे पन्नास हजारांचे दागिने लंपास केले़ काही दिवसांपूर्वी अशोका स्कूल व राजीवनगर परिसरात तोतया पोलिसांनी दोघा वृद्धांचा सुमारे ८० हजारांचा ऐवज लंपास केला होता़ या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)
इंदिरानगरमध्ये तोतया पोलिसांकडून वृद्धाची लूट
By admin | Published: November 14, 2015 11:04 PM