लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : षटकार आणि चौकार मारल्यानंतर होणारा जल्लोष, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, सामन्यातील प्रत्येक चेंडूवर बदलणारा निकाल, सोबतीला हिंदी-मराठी संगीताची साथ आणि प्रसंगी त्यावर धरलेला ठेका नाशिककरांनी रविवारी (दि. २१) अनुभवला. निमित्त होते ‘आयपीएल फॅन्सपार्क’ चे.यंदाच्या दहाव्या आयपीएल क्रिकेट टी - २० स्पर्धेतील हैदराबाद येथे सुरू असलेल्या अंतिम सामन्याचे प्रक्षेपण नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि व्हिवो मोबाइल यांच्यातर्फे जुने सीबीएस येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आले होते. मुंबई विरुद्ध पुणे या दोन्हीही महाराष्ट्रच्या संघात हा सामना होत असल्याने सामना पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये दोन्हीही संघांना प्रोत्साहन देणारे नाशिककर क्रिकेट रसिक बघायला मिळाले. मोठ्या एलइडी स्क्रीनवर विानामूल्य दाखविण्यात येणारा हा सामना पाहण्यासाठी नाशिकच्या क्रीडापे्रमींनी शिवाजी स्टेडिअमवर रविवारी संध्याकाळपासूनच गर्दी केली होती.मुंबई आणि पुणे या दोन्ही संघाना समर्थन करण्याच्या दृष्टीने आलेल्या युवा वर्गाने दोन्ही संघांची जर्सी, टोपी असा पेहराव करत हातात संघाचा झेंडा तसेच काही युवकांनी गालावर रंगवलेला संघाचा झेंडा असे प्रत्यक्ष मैदानावर बघायला मिळणारे दृश्य याठिकाणीही बघायला मिळाले. सामन्यामध्ये षटकार किंवा चौकार मारल्यावर ज्या प्रमाणे मैदानात जल्लोष केला जातो तसाच जल्लोष हा सामना बघण्यासाठी आलेल्या रसिकांनीही केला. गडी बाद झाल्यानंतर एका गटात जल्लोष, तर दुसऱ्या गटात मात्र आपला आवडता फलंदाज बाद झाल्याचे दु:ख क्रीडाप्रेमींना लपवता येत नव्हते. क्रीडारसिकांचा उत्साह आणखी वाढावा यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे संगीत व्यवस्थेचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
अंतिम सामन्याचा लुटला आनंद
By admin | Published: May 22, 2017 2:50 AM